मुंबई : सध्याच्या मुलांच्या संगोपनात काही तरी चूक घडत आहे. त्यामुळेच एका मुलाने वृद्ध पालकांना तीर्थयात्रेला नेण्याऐवजी न्यायालयात खेचले, अशी खंत उच्च न्यायालयाने व्यक्त केली. तसेच, आताचा समाज श्रावणबाळाची महती विसरल्याची टिप्पणी करून पालकांविरुद्ध प्रतिबंधात्मक आदेश मागणाऱ्या गोरेगावस्थित मुलाला दिलासा देण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला.

पालकांना उपचारासाठी मुंबईत यायचे आहे आणि त्यासाठी त्यांना मुंबईतील आपल्या घरी राहायचे आहे. तथापि, त्यांना मुंबईतील आपल्या घरात येण्यापासून मज्जाव करावा, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली होती. तथापि, न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने त्याची ही मागणी मान्य करण्यास नकार दिला. मुंबईतील एका दिवाणी न्यायालयाने जानेवारी २०१८ मध्ये याचिकाकर्त्याच्या पालकांच्या बाजूने निर्णय दिला होता. या निर्णयाला याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

न्यायालयाने या प्रकरणी आदेश देताना मुलांकडून पालकांना दिल्या जाणाऱ्या वाईट वागणुकीबाबत संताप व्यक्त केला. ही आणखी एक घटना आणि दुःखद परिस्थिती असल्याची टिप्पणीही न्यायालयाने केली. याचिकाकत्त्याने आजारी आणि वृद्ध पालकांची काळजी घेण्याचे नैतिक कर्तव्य बजावण्याऐवजी त्यांना त्याच्या घरात येण्यापासून रोखण्याची मागणी केल्याची खंत न्यायालयाने व्यक्त केली. भारतीय संस्कृतीत रुजवलेल्या नैतिक मूल्यांत झालेली घसरण यातून प्रतीत होत असल्याचे नमूद करताना पालकांना तीर्थयात्रेला घेऊन जाणाऱ्या आणि वाटेत आपले जीवन अर्पण करणाऱ्या श्रावणबाळाला आपण विसरलो आहोत, असे न्यायालयाने म्हटले.

आजच्या युगात, आपल्या मुलांच्या संगोपनात काही तरी गंभीर चूक घडत आहे. त्यामुळेच मुलगा पालकांना तीर्थयात्रेऐवजी न्यायालयात येण्यास भाग पाडच आहे, असे न्यायालयाने म्हटले. पालक-मुलाच्या नात्याबद्दल मत व्यक्त करताना पालकांची काळजी घेणे हे एक पवित्र आणि नैतिक कर्तव्य आहे. पालकांची काळजी घेणे हे प्रेमाचे काम आहे. पालकांचा आदर आणि काळजी घेण्याचा निर्णय घेता तेव्हा ते केवळ एखाद्याच्या कृतज्ञतेची अभिव्यक्ती नसते तर ते देवाला पूजण्यासारखे असल्याचेही न्यायालयाने म्हटले. तथापि, पालक दहा मुलांची काळजी घेऊ शकतात, परंतु कधीकधी दहा मुले त्यांच्या पालकांची काळजी घेऊ शकत नाहीत, दुर्दैवाने हे कटू सत्य असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले.

आदेशाचे उल्लंघन झाल्यास मुलावर कारवाई

याचिकाकर्त्याचे पालक सध्या त्यांच्या तिसऱ्या मुलासोबत कोल्हापूर येथे राहत आहेत, परंतु त्यांना उपचारांसाठी वारंवार जे. जे. रुग्णालयात यावे लागते. त्यामुळे, पालक उपचारासाठी मुंबईत येतील तेव्हा याचिकाकर्ता किंवा त्याच्या पत्नीने त्यांना आपल्या घरी आणावे आणि उपचारांसाठी त्यांच्यासह रुग्णालयात जावे. आदेशाचे उल्लंघन झाले किंवा पालकांची कोणतीही गैरसोय झाली तर याचिकाकर्त्याला अवमानप्रकरणी दोषी ठरवले जाईल आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही न्यायालयाने दिला.