मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या सहकार्याने बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या आवारात ३ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी ९.३० ते रात्री ९.३० दरम्यान ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनात विविध विषयांवरील मराठी भाषेतील हजारो पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत.

प्रदर्शनात पुस्तकांच्या खरेदीवर वाचकांना १५ टक्क्यांची विशेष सवलत देण्यात येत आहे. तसेच, प्रदर्शनातील सेल्फी पॉईंटसह छायाचित्र घेऊन त्यात महानगरपालिकेच्या एक्स (ट्विटर), इन्स्टाग्राम किंवा फेसबुक या सोशल मीडिया हँडलला ‘टॅग’ करणाऱ्या वाचकांना ५ टक्क्यांची अतिरिक्त सवलत देण्यात येणार आहे. यामुळे वाचकांना पुस्तकांच्या खरेदीवर तब्बल २० टक्क्यांची सवलत मिळू शकेल.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनानुसार, आयोजित करण्यात आलेल्या या ग्रंथप्रदर्शनासाठी उपायुक्त अजितकुमार आंबी यांचेही विशेष मार्गदर्शन लाभले. या प्रदर्शनात २०० प्रकाशकांच्या आणि १० हजार लेखकांच्या जवळजवळ ५० हजार पुस्तकांची लक्षवेधी मांडणी करण्यात आली आहे. या प्रदर्शनात दर आठवड्याला नवनवीन पुस्तके वाचकांना उपलब्ध करण्यात येणार आहेत. मान्यवर साहित्यिकांच्या सर्जनशील साहित्याबरोबर नित्योपयोगी अशा विविध विषयांवरची विविध पुस्तके या प्रदर्शनात खरेदी करता येतील.

या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या प्रदर्शनात वाचकांच्या सेवेला असणारा कर्मचारीवर्ग जाणकार असल्याची काळजी घेण्यात आली आहे. यामुळे पुस्तक प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना त्यांच्या आवडीचे पुस्तक शोधणे सुलभ होणार आहे. या ग्रंथ प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी ३१ ऑक्टोबर रोजी निवडक पुस्तक खरेदीदारांची निवड सोडतीच्या अर्थात ‘लकी ड्रॉ’ च्या आधारे करण्यात येणार आहे. निवडण्यात येणाऱ्या पाच भाग्यवान वाचकांना दिवाळी अंकांचा संच ग्रंथाली संस्थेतर्फे मोफत भेट स्वरूपात देण्यात येणार आहे.

‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’च्या निमित्ताने आपल्या घरातील लहान मुलांना पुस्तकांशी जोडण्यासाठी, तरुणाईत वाचन संस्कृतीबाबत जागरुकता निर्माण आणि अभिजात मराठी भाषेतील साहित्य अनुभवण्यासाठी या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी, असे आवाहन समन्वयक (क्रीडा व मनोरंजन) संदीप वैशंपायन यांनी केले आहे.