भूगोल आणि इंग्रजी माध्यमाचे मराठी भाषेचे पुस्तक वगळता इयत्ता दहावीची सर्व पाठय़पुस्तके बाजारात उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दहावीची आयटीसी, कुमारभारती (मराठी), लोकभारती (हिंदी), इंग्रजी, संस्कृत (द्वितीय), हिंदी (लोकवाणी), इतिहास आदी महत्त्वाच्या विषयांची पुस्तके ‘महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती मंडळा’तर्फे (बालभारती) सोमवारपासून बाजारात उपलब्ध करून देण्यात आली. दहावीचा नवीन अभ्यासक्रम अमलात आल्यानंतर सगळीच्या सगळी पाठय़पुस्तके एप्रिल महिन्यातच उपलब्ध करून देण्याचा विक्रम बालभारतीच्या इतिहासात प्रथमच होत आहे. पहिल्याच दिवशी तब्बल ८ कोटी रुपयांची पुस्तके विकली गेल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले.
पाठय़पुस्तकांच्या विलंबाने होणारी विद्यार्थ्यांची ही अडचण ‘लोकसत्ता’ने मार्च महिन्यातच वृत्त प्रकाशित करून लक्षात आणून दिली होती. त्यानंतर पाठय़पुस्तकांच्या निर्मितीला वेग आला. पुस्तके एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात उपलब्ध करून देऊ, हे त्यावेळी दिलेले आश्वासन ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ’ आणि ‘बालभारती’ने पाळले आहे. केवळ भूगोल आणि इंग्रजी माध्यमाचे मराठी भाषा विषयाचे पुस्तक वगळता सर्व महत्त्वाच्या विषयांची पुस्तके बालभारतीने बाजारात आणली. ही दोन पुस्तकेही दोन दिवसांत बाजारात येतील, असे बालभारतीचे नियंत्रक विवेक गोसावी यांनी सांगितले.