मुंबई : बोरिवलीत वास्तव्यास असलेल्या ६३ वर्षीय वकिलाला मसाज करणे चांगलेच महागात पडले. या वकिलाने आंतरजालावरून मसाज करणाऱ्यांचा क्रमांक शोधून त्यांना घेऊन घरी बोलावले. मात्र या मसाज करणाऱ्यांनी वकिलाचे अश्लील चित्रिकरण करून ५० हजार रुपयांची खंडणी उकळली. ही छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन ६ लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

गुजरातमधील भावनगर येथील मुळ रहिवासी असलेले ६३ वर्षीय वकील दहिसर येथे पत्नी व मुलासह वास्तव्यास आहेत. वकिलाला शरीरदुखीचा त्रास होता. त्यामुळे त्याने आंतरजालात (इंटरनेटवर) घरपोच मसाज सेवा देणाऱ्याचा शोध घेतला. त्याला जुलै महिन्यात मसाज करणाऱ्याचा एका मोबाइल क्रमांक सापडला. त्याचे नाव समीर अली उर्फ कन्हैया होते. या वकिलाची एक सदनिका बोरिवलीत असून ती रिकामी आहे. वकिलाने समीरला मसाज करण्यासाठी तेथे बोलावले. पहिला मसाज व्यवस्थित झाला. त्या बदल्यात समीरने ७ हजार रुपये घेतले.

ब्लॅकमेलिंगची सुरूवात

तक्रारदार वकिलाने ७ सप्टेंबर रोजी पुन्हा मसाजसाठी समीर अलीशी संपर्क साधला. पण तो उपलब्ध नव्हता. त्याऐवजी त्याचा मित्र मुन्ना वकिलाच्या सदनिकेवर आला. यावेळी मुन्नाने वकिलाची काही अश्लील छायाचित्रे आणि चित्रफिती काढली. काही वेळाने समीर अली तेथे आला. त्या दोघांनी मिळून अश्लील छायाचित्रे आणि चित्रफितींच्या आधारे वकिलाला धमकावले. जर वकिलाने ६ लाख रुपये दिले नाही तर छायाचित्रे, चित्रफिती व्हायरल करण्याची धमकी दिली. वकिलाने त्याला नकार दिला. तेव्हा दोन्ही आरोपींनी वकिलाला मारहाण केली. वकिलाचा मोबाइल घेऊन त्यांच्या बॅंक खात्यातील ५० हजार रुपये स्वत:च्या बँक खात्यात हस्तांतरित केले. पुढील रक्कम लवकर दिली नाही तर छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन ते निघून गेले.

अखेर पोलीस ठाण्यात तक्रार

त्यानंतरही दोन्ही आरोपी वकिलाला वारंवार धमकी देत होते. ७ ते २३ सप्टेंबरदरम्यान हा प्रकार सुरू होता. अखेर वकिलाने बोरिवली पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत मारहाण, खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

असे पकडले आरोपींना

आरोपींचा काही ठावठिकाणा नव्हता. त्यामुळे पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी वकिलाच्या मदतीने सापळा लावला. वकिलाने उर्वरित रक्कम देण्यास तयार असल्याचे आरोपींना सांगितले. त्यासाठी दोघांना खेरवाडीत भेटण्यासाठी बोलवाले. पोलीसांनी तिथे सापळा रचला आणि दोघांना ताब्यात घेतले. समीर अली (२१) आणि भूपेंद्र सिंग उर्फ मुन्ना (२५) अशी या आरोपींची नावे आहेत.

मोबाइलमध्ये अनेकांच्या अश्लील चित्रफिती

आरोपींनी यापूर्वी मुंबईतील श्रीमंत घरांमधील ज्येष्ठ नागरिकांची देखभाल करण्याचे (केअरटेकर) काम केले आहे. याशिवाय ते मसाज सेवा देण्याचे काम करत होते. पोलीसांनी आरोपींचे मोबाइल जप्त केले आहेत. या मोबाइलमध्ये अनेकांची अश्लील छायाचित्रे आढळली. आरोपी सराईत असून त्यांनी अशा प्रकारे अनेकांना ब्लॅकमेल करून खंडणी उकळल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.