मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीव व निसर्गास वाढत्या प्रमाणात होणाऱ्या त्रासाबाबत पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात धार्मिक कार्यक्रमांच्या नावाखाली उद्यानाच्या नियमांना बगल दिली जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.
बोरिवलीतील संजय गांधी उद्यानात पुन्हा एकदा नदीत स्नान करणे, झाडाला फलक लावण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी कावड यात्रेदरम्यान उद्यानातील नदीचे पाणी घेण्यासाठी नागरिक नदीत उतरले होते. या दोन्ही घटनांमुळे पुन्हा एकदा प्रशासनाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पर्यावरणप्रेमींच्या मते, या कार्यक्रमांमुळे उद्यानातील वनस्पती व वन्यप्राण्यांवर गंभीर परिणाम होत आहेत. या कार्यक्रमांचे संबंधित छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफितीसह पर्यावरणासाठी काम करणाऱ्या वनशक्ती या संस्थेमार्फत अधिकाऱ्यांना पत्र पाठवून नियमांचे उल्लंघन झाल्याचे पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, उद्यानात केवळ महाशिवरात्रीचा कार्यक्रम परवानगीने होतो असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र, अलीकडे इतर धार्मिक कार्यक्रम परवानगीशिवाय किंवा नियमभंग करुन होत असल्याचे म्हटले आहे. गेल्या महिन्यात २८ जुलै रोजी तसेच आता ९ ऑगस्ट रोजी उद्यानात झालेल्या कार्यक्रमांचा उल्लेख करत पर्यावरणप्रेमींनी हे कार्यक्रम वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच झाल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, आरेतील आदिवासींनी झाडे लावली तर त्यांना नोटीस बजावली जाते. मात्र, उद्यानातील नदीत अंघोळ करणाऱयांना व गोंधळ घालणाऱ्या गर्दीला मोकळीक दिली जाते, अशी टीकाही यावेळी करण्यात आली आहे. त्याचबरोबर वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी या प्रकारांवर तातडीने कठोर कारवाई करावी आणि झालेल्या कार्यक्रमांसाठी कोणत्या परवानग्या देण्यात आल्या याची माहिती द्यावी, अशी मागणीही पत्राद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.
याआधी कावड यात्रेचा जमाव
मागील महिन्यात श्रावणी सोमवारी कावड यात्रेसाठी उद्यानात उतरून नदीतून पाणी भरुन घेतले होते. सोमवारी राष्ट्रीय उद्यान बंद असताना तसेच परवानगी नसतानाही एक जमाव कावड यात्रेचे पाणी घेण्यासाठी उद्यानात शिरला होता. दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील नदीत होणाऱ्या गणेश विसर्जनामुळे नदी प्रदूषित होत असल्याबाबत २०२२ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निकाल देताना उच्च न्यायालयाने उद्यानात कोणतेही धार्मिक विधी करण्यास मनाई केली होती. त्यामुळे तेथे होणाऱ्या सर्वच धार्मिक कार्यक्रमांना व्यवस्थापन परवानगी नाकारते.
नागरिक इथपर्यंत येतातच कसे हा महत्त्वाचा प्रश्न या दोन घटनांमुळे पडला आहे. याचबरोबर या प्रसंगाचे प्रसारित झालेले छायाचित्र, ध्वनिचित्रफित पाहता तेथे पोलिसही हजर होते. तरीसुद्धा कोणतेही दखल घेतली जात नाही ही आश्चर्याची बाब आहे. – स्टॅलिन डी, पर्यावरणप्रेमी, संचालक, वनशक्ती
उच्च न्यायालयाने अगोदरच यासंबंधी जनहित याचिका दाखल केली असूनही त्याच्या विरुद्ध गोष्टी या ठिकाणी केल्या जात आहेत. आम्ही याप्रकरणी अवमान याचिका दाखल करणार आहोत. – रोहीत जोशी, पर्यावरणप्रेमी, संयोजक, नॅशनल एन्व्हायनर्मेंटल वॉच