संदीप आचार्य

मुंबई : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील रुग्णालयातील वाढत्या मृत्यूंच्या घटनांनी राज्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले असतानाच आरोग्य विभागाच्या दोन्ही हंगामी संचालकांना तडकाफडकी पदमुक्त करण्यात आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे दोघेही आरोग्य संचालकपदाचा हंगामी कार्यभार सांभाळत होते. मात्र, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोणतेही सबळ कारण न देता ११ ऑगस्ट रोजी शासननिर्णयाद्वारे डॉ. स्वप्निल लाळे आणि डॉ. नितीन अंबाडेकर यांच्याकडील आरोग्य संचालकपदाचा कार्यभार काढून घेतला आहे.

राज्यात साथीच्या आजारांनी उचल खाल्ली आहे. त्यातच कळवा येथील ठाणे पालिकेच्या रुग्णालयातील रुग्णमृत्यूंच्या वाढत्या घटनांनी आरोग्य यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. अशा वेळी आरोग्य यंत्रणा बळकट करण्याची गरज असताना आरोग्य संचालकांना कार्यमुक्त करण्याचा आरोग्यमंत्र्यांचा निर्णय मनमानी असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. डॉ. लाळे आणि डॉ. अंबाडेकर हे गेल्या काही महिन्यांपासून अनुक्रमे आरोग्यसेवा संचालक (१) आणि (२) या पदांवर कार्यरत होते. मात्र, आता त्यांना त्यांच्या पूर्वीच्या सहसंचालकपदी काम करण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत काढण्यात आलेल्या शासन आदेशात कोणतेही सबळ कारण देण्यात आलेले नाही. डॉ. नितीन अंबाडेकर यांची यापूर्वी दोन वेळा दिल्लीतील ‘एम्स’मध्ये तसेच केंद्रीय आरोग्य विभागात निवड झाली होती. तथापि तत्कालीन वरिष्ठांच्या आग्रहामुळे त्यांनी राज्याच्या आरोग्यसेवेत काम करणे पसंत केले होते. या दोन्ही अधिकाऱ्यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

राज्याचे माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी या निर्णयाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोग्य विभागासाठी ‘स्वतंत्र हेल्थ केडर’ निर्माण करण्याचे धोरण शासनाने काही वर्षांपूर्वी मान्य केले होते मात्र त्याची अंमलबजावणी कोणीही आरोग्यमंत्री करत नाही. आरोग्य यंत्रणेतील संचालक, सहसंचालक, अतिरिक्त संचालक यांना प्रशासकीय प्रशिक्षण दिले जात नाही. त्यांना कोणतेही अधिकार दिले जात नाहीत. आज जवळपास संपूर्ण आरोग्य संचालनालय हंगामी म्हणून कार्यरत असून याची जबाबदारी आरोग्यमंत्री घेणार का, असा सवाल डॉ. साळुंखे यांनी केला.

४१ पैकी ३४ पदे हंगामी

राज्याच्या आरोग्य विभागाचा कारभार ज्या आरोग्य संचालनालयातून चालतो तेथील संचालक ते उपसंचालक या ४१ पदांपैकी ३४ पदे ही हंगामी आहेत. आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी पूर्णवेळ नियुक्ती तसेच कालबद्ध पदोन्नती हे उपाय करण्याची गरज आहे. मात्र, त्याऐवजी सध्या कार्यरत असलेल्या हंगामी अधिकाऱ्यांना हटवून आरोग्यमंत्र्यांनी तुघलकी निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. गेल्या वर्षभरात आरोग्यविभागाने एवढे प्रचंड काम केल्याचा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत करत आहेत, असे असताना आरोग्य विभागाचे नेतृत्व करणाऱ्या दोन्ही हंगामी आरोग्य संचालकांना पदमुक्त का केले, असा सवाल आरोग्य विभागातील डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.