मुंबई : मोठ्या भावाशी खेळताना झालेल्या अपघातात डोंबिवलीतील तीन वर्षीय बालकाच्या डोक्याला मार लागला. त्याला परळ येथील वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मेंदूमृत झाल्याने त्याच्या पालकांनी त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चौघांना जीवदान मिळाले आहे. ते बालक मुंबईतील तिसरा सर्वात लहान अवयव दाता ठरले आहे. यापूर्वी २०१९ मध्ये मुंबईमध्ये दोन वर्षाच्या इवानने तर २००१ एकमध्ये १८ महिन्याच्या लहान मुलीचे अवयवदान करण्यात आले होते.

हेही वाचा >>> मुंबई विद्यापीठाकडून प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणीसाठी तीन दिवसांची मुदतवाढ, विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंत पदवी अभ्यासक्रमांसाठी नाव नोंदणी करता येणार

डोंबिवलीत राहत असलेला तीन वर्षाचा हा मुलगा ५ जून रोजी आपल्या मोठ्या भावाबरोबर घराबाहेर खेळत असताना जवळच असलेली मोटारसायकल त्याच्या अंगावर पडली. त्याच्या डोक्याला मार लागल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला तातडीने जवळील रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला वाडिया रुग्णालयात नेण्यास सांगितले. मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही त्याची प्रकृती गंभीर होऊन ९ जून रोजी त्याला डॉक्टरांनी मेंदूमृत घोषीत केले. स्थानिक अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर १० जून रोजी त्याचे अवयवदान करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वाडिया रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. या मुलाचे हृदय, यकृत आणि मूत्रपिंड दान करण्यात आल्याने चौघांना जीवदान मिळाले.