जगातील प्रसिध्द शहरे न्यूयॉर्क आणि मेलबर्नपासून प्रेरणा घेत मुंबई महानगरपालिकेने मुंबईला नवी ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे. महापालिकेने मुंबईसाठी ‘माझी मुंबई’ अशी संकल्पना तयार केली असून त्याचे बोधचिन्हसुध्दा तयार केले आहे.
‘मुंबई’ हा शब्द स्थानिकांची देवी ‘मुंबादेवी’ आणि ‘आई’ या दोन शब्दांमधून तयार झाला आहे. ‘माझी मुंबई’ ही संकल्पना या शहरांत राहणा-या व्यंक्तींच्या मनात आपुलकीची भावना निर्माण करते, असे अंब्रेला डिझाईनचे भूपाल रामनाथकर म्हणाले. रामनाथकर यांच्या कंपनीने हे बोधवाक्य तयार केले आहे.
या शहराने प्रत्येकाला आईसारखे प्रेम दिले आहे म्हणूनच काळा, नारंगी आणि निळ्या रंगातील हे बोधचिन्ह मोत्यासारखे दिसणारे असून आईने आपल्या बाळाला कवेत घेतले आहे अशा प्रकारे त्यांची संरचना आहे, असे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना नगरसेवक राहुल शेवाळे म्हणाले.        
हे नवे बोधचिन्ह मुंबई महानगरपालिकेच्या बोधचिन्हासोबत सर्व कामांसाठी वापरले जाईल. नवीन बोधचिन्हाचा वापर हा परिपत्रके, संपर्क साधने तसेच महापालिकेचा ध्वज, खांब, दिशादर्शक, कचराकुंड्या, जनजागृती अभियान आणि महत्वाच्या पर्यटन स्थळांवर केला जाईल.
या बोधचिन्हातील केशरी रंगाची पाने ही एकता, मैत्री, आनंद, सुंदरता आणि प्रगतीची द्योतक असल्याचे रामनाथकर म्हणाले. यामधील निळा रंग हा मुंबईची ओळख असलेला आकाशाचा विशालपणा आणि पाण्याची खोली दर्शवतो.
या बोधचिन्हातून मुंबईची, संस्कृती, ऐतिहासिक वारसा, विचारसरणी, औद्योगिकता आणि व्यवसायायीक यशाचे दर्शन होते, असं शेवाळे म्हणाले.
याशिवाय २४ प्रभागांना नवी ओळख देण्यात येणार असून त्यांना प्रत्येकी वेगळा रंग देण्यात आला आहे. यापुढे रंग हा प्रभागाची ओळख असणार असून, त्याप्रमाणे नागरिक आपला प्रभाग ओळखू शकतील. यामुळे नागरिकांमध्ये एकतेची भावना निर्माण होईल आणि प्रभागांना तसेच तेथील नागरिकांना वेगळी अशी ओळख मिळेल, असंही शेवाळे पुढे म्हणाले.
दरम्यान, शिवसेनाचा गढ असलेल्या दादर आणि वरळी येथील प्रभागांना केशरी आणि उच्चभ्रू वांद्रे पश्चिम प्रभागाला गडद गुलाबी रंग देण्यात आला आहे