मुंबई : माय मराठीचा गौरव आणखी द्विगुणित करण्यासाठी आणि मराठी भाषेचा समृद्ध वारसा वृद्धिंगत व्हावा यासाठी यंदा जास्तीत जास्त गणेश मंडळांनी मराठी भाषा मराठी संस्कृतीचा हजारो वर्षांचा इतिहास सामाजिक देखाव्यातून साकारावा. तसेच, उत्सव काळात मराठी सुगम संगीत, भावगीत, भक्तिगीत, भजने, गाणी यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मुंबईत गणेशोत्सव मंडळांना केले आहे.
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून सर्व गणेश मंडळांची लगबग सुरू झाली आहे. देखाव्यासाठी गणेश मंडळे विशेष मेहनत घेत आहेत. यंदा गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून घोषित करण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या काळात गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवण्याचे आवाहन समितीने मंडळांना केले आहे.
तसेच, महाराष्ट्राला संत परंपरेचा वारसा लाभला आहे. संत महात्म्यांनी मराठी भाषेतूनच धर्माचा प्रचार, प्रसार आणि समाज प्रबोधनाचे काम केले. मराठी भाषेला सर्वदूर पोहोचवण्यासाठी थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळकांनी देखील प्रयत्न केले आहेत. त्यामुळे मराठीचे महत्व अनन्यसाधारण आहे, असे मत समितीने व्यक्त केले आहे.
‘जो पर्यंत मराठी भाषेचा अभिमान बाळगून तिच्या वृद्धीसाठी प्रयत्न करणे आपले कर्तव्य आहे असे महाराष्ट्रातील सुशिक्षित लोकांना वाटत नाही, तो पर्यंत मराठी भाषा चांगल्या नावरूपास येण्याची आशा नको, असे सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या लोकमान्य टिळकांनी म्हटले होते. त्यामुळे यंदा गणेश मंडळांनी मराठी सुगम संगीत भावगीत भक्तिगीत भजने यांना प्राधान्य देऊन मराठीचा जागर करावा, असे समितीकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारने यंदापासून गणेशोत्सव हा राज्य महोत्सव असल्याची घोषणा केली आहे. ही घोषणा स्वागतार्ह आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा आणि गणेशोत्सवाला राज्य महोत्सव घोषीत करणे म्हणजे दुग्धशर्करा योग आहे. भाषेची आणि उत्सवाची सांगड घालून मराठीचा जागर करूया, असे आवाहन समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. नरेश दहिबावकर यांनी केले आहे.