|| सुशांत मोरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
  • एकूण प्रकल्पातील अवघे ३५ टक्केच भूसंपादन
  • ‘नॅशनल हायस्पीड रेल कॉपरेरेशन लिमिटेड’ची माहिती
  • वांद्रे कुर्ला संकुल ते शीळफाटापर्यंतच्या २१ किमी बोगद्याचे काम २०२० पासून सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील भूसंपादनाचे काम अधांतरीच आहे. एकूण प्रकल्पातील अवघे ३५ टक्केच भूसंपादन झाल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉपरेरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी दिली.

गुजरातबरोबरच महाराष्ट्रातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यतील भूसंपादनाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. हा तिढा सुटलेला नसतानाही वांद्रे कुर्ला संकुल ते कल्याण शीळफाटापर्यंत २१ किलोमीटर बोगद्याच्या कामाला जानेवारी २०२० पासून सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या बोगद्यासाठीच्या निविदा प्रक्रियेलाही सुरुवात झाली असून ऑगस्ट २०१९ ही अंतिम मुदत आहे.

मुंबई ते अहमदाबाद अंतर साधारण अडीच ते तीन तासांत अंतर पार करणारी बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत सेवेत आणली जाणार आहे. प्रकल्पासाठी सरकारी व खासगी अशी एकूण १,४३४ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यासह, गुजरात, दादरा-नगर हवेली येथून बुलेट ट्रेनचा प्रकल्प जाणार आहे. गुजरातमधील काही भागात विरोध होत असतानाच महाराष्ट्रातील पालघर व ठाणे जिल्ह्यतील भूसंपादनाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. यासंदर्भात व्यवस्थापकीय संचालक अचल खरे यांनी सांगितले की, प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण जमिनीपैकी ३५ टक्केच भूसंपादन झाले आहे. पालघर जिल्ह्यतील ७९ गावांपैकी २५ ते ३० गावांमधील स्थानिकांकडून विरोध होत आहे. भूसंपादनाविषयी त्यांचे असलेले प्रश्न सोडवण्यात येतील. ठाणे जिल्ह्यत २६ गावे येत असून संयुक्त मोजणी सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात भूसंपादन करण्यात काही अडचणी येत आहेत.

खरे यांनी भूसंपादनात अडचणी येत असल्या तरी प्रकल्पातील बोगद्याचे काम थांबणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. वांद्रे कुर्ला संकुल ते कल्याण शीळफाटा अशा २१ किलोमीटर बोगद्याच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबविली जात असल्याचे सांगितले. २३ एप्रिल रोजी सुरू केलेली प्रक्रियेची अंतिम मुदत ऑगस्ट महिन्यात आहे. त्यानंतर बोगद्याच्या कामाच्या प्रक्रियेलाही तीन ते चार महिने लागतील व त्यानंतर प्रत्यक्षात कामाला जानेवारी २०२० पासून सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे खरे म्हणाले.

६९ हेक्टर जमीन संपादित

महाराष्ट्रात ६५० हेक्टर जमीन संपादनासाठी ऑक्टोबर २०१७ पासून प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु अद्याप सरकारी व खासगी अशी ६९ हेक्टर जमीनच संपादित होऊ शकली आहे. सरकारी ३५ हेक्टर व खासगी ३४ हेक्टर जमिनीचा यात समावेश आहे.

भरती प्रक्रियेलाही २०२० पासून सुरुवात

बुलेट ट्रेन प्रकल्पात २०२० च्या सुरुवातीपासूनच भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. जवळपास ३,५०० विविध पदे भरली जातील, अशी माहिती खरे यांनी दिली. यात चालक, तांत्रिक कर्मचाऱ्यांसह अन्य पदे असतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bullet train land acquisition elementary
First published on: 05-05-2019 at 01:32 IST