मुंबईः जेवण्यासाठी चाललेल्या ५२ वर्षीय व्यापाऱ्याच्या दुचाकीला डंपरने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. वांद्रे पश्चिम परिसरात हा अपघात घडला. याप्रकरणी व्यापाऱ्याच्या मुलाने केलेल्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी आरोपी डंपर चालकविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश जैन असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. ते सांताक्रुझ पश्चिम येथील रहिवासी होते. वांद्रे पश्चिम येथे त्यांचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे जैन मंंगळवारी दुकानात गेले असता तेथे नियमीत काम केल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमासार ते जेवणाचा डबा आणण्यासाठी घरी गेले होते. त्यावेळी वांद्रे पश्चिम येथील हिल रोड परिसरात त्यांच्या दुचाकीला डंपरने धडक दिली. त्यात ते दुचाकीवरून खाली कोसळले. त्यांना तात्काळ स्थानिकांच्या मदतीने वांद्रे येथील भाभा रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून जैन यांना मृत घोषित केले.

अपघात झाल्यानंतर जैन यांच्या दुकानात काम करणाऱ्या चंदन राजपूत यांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ जैन यांचा मुलगा रोहित कुमार जैन याला घटनेची माहिती दिली. रोहित जैन हे तातडीने वांद्रे येथील भाभा रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना वडिलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्याने माहिती घेतली असता हिल रोड येथे वडील दिनेश जैन यांच्या दुचाकीला डंपरने धडक दिल्याचे समजले. त्यानुसार रोहितकुमार यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी डंपरचालक सिद्धार्थ गणेश कांबळे (२६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सिद्धार्थ हा दहिसर येथील रावळपाडा परिसरात राहात असून डंपर चालक म्हणून कामाला होता.

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार २०२२ मध्ये महाराष्ट्रात १५ हजार २२२ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. मुंबईत तुलनेने प्रमाण कमी आहे. पण मृतांमध्ये दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीसीटीव्हीमुळे महत्त्वाची माहिती

मृत दिनेश जैन मुलगा रोहित, मुलगी व पत्नी यांच्यासोबत सांताक्रुझ परिसरात राहत होते. ते नियमीत जेवण्यासाठी अथवा कर्मचाऱ्यांचा डबा आणण्यासाठी दुपारी घरी जायचे. ते मंगळवारी नेहमीप्रमाणे घरी जात असताना डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यावेळी घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रिकरणाची पोलिसांनी तपासणी केली असून अपघाताचे चित्रीकरण पोलिसांच्या हाती लागले आहे. त्याशिवाय प्रत्यक्षदर्शींनी अपघातावेळी डंपरचा क्रमांकही नोंदवला होता. याप्रकरणी वांद्रे पोलीस अधिक तपास करत आहेत.