मुंबई :व्यावसायिक रियाज भाटी याला विशेष न्यायालयाने नुकतेच खंडणी प्रकरणातून दोषमुक्त केले. पोलिसांनी नोंदवलेले साक्षीदारांचे जबाब अस्पष्ट आणि ऐकीव आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने भाटी याला प्रकरणातून दोषमुक्त करताना नोंदवले. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या टोळीशी भाटी याचा संबंध असल्याचा त्याच्यावर आरोप होता.
भाटी याने प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) स्थापन विशेष न्यायालयात अर्ज केला होता. विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी त्याचा हा अर्ज काही दिवसांपूर्वी मान्य केला. एका व्यावसायिकाने २०२२ मध्ये वर्सोवा पोलिस ठाण्यात भाटीविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यात, भाटी याच्या वाढदिवसाच्या पार्टीत भाटी आणि फरारी गुंड छोटा शकील याचा मेहुणा सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट यांनी आपल्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला होता. भाटी आणि सलीम फ्रूट या दोघांनी आपल्याला ३० लाख रुपये किमतीची कार आणि ७.५ लाख रुपये रोख रक्कम देण्यास भाग पाडले, असा आरोप तक्रारदार व्यावसायिकाने तक्रारीत केला होता.
दरम्यान, आपल्याकडून कोणताही गुन्हा घडल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट झालेले नाही. किंबहुना, आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आले आहे, असा दावा करून भाटी याने दोषमुक्तीची मागणी केली होती. तथापि, आरोपी पार्टीचा आनंद घेत होता. त्यामुळे, तक्रारदाराकडून खंडणी वसूल करण्याचा गंभीर गुन्हेगारी कट रचण्याचा प्रयत्न करत होता हे स्वीकारणे कठीण आहे. हा आरोप विश्वासार्ह वाटत नाही. शिवाय, वाढदिवसाच्या पार्टीत उपस्थित असलेल्या साक्षीदारांचे जबाब अस्पष्ट आणि ऐकीव स्वरूपाचे होते. तक्रारदाराने स्वतः देखील भाटी याच्याविरुद्ध थेट आरोप केलेला नाही. त्यामुळे, या प्रकरणी तक्रार दाखल झाली असली तरी आरोपीला दोषी ठरवण्यासाठी ठोस आणि पुरेसे पुरावे नाहीत, असेही न्यायालयाने भाटी याला दिलासा देताना नमूद केले.