मुंबई : मेट्रो रेल्वेसाठी आरेतील कारशेडचे काम वर्षभरात पूर्ण होईल आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.

आरे कारशेडविरोधातील आंदोलनामागे छद्म किंवा खोटे पर्यावरणवादी असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. कारशेड कांजूरमार्ग येथे स्थलांतरित केली, तर प्रकल्प खर्चात आणखी प्रचंड वाढ होऊन नाकापेक्षा मोती जड, अशी अवस्था होईल, असे त्यांनी सांगितले. आरे कारशेडचे २५ टक्के काम आमच्या सरकारने पूर्ण केले होते आणि ती जागा राखीव वन क्षेत्रात मोडत नाही. कारशेडचे काम पूर्ण होईपर्यंत मेट्रो प्रकल्प सुरू होऊ शकत नाही. कारशेडसाठी आधीच झालेल्या विलंबामुळे प्रकल्प खर्चात सुमारे १० हजार कोटी रुपये वाढ झाली असून कांजूरला जर कारशेड केली, तर काम पूर्ण होण्यास चार वर्षे लागतील आणि प्रकल्प खर्चात २०-२५ हजार कोटी रुपयांची वाढ होईल. त्यामुळे मूळ मेट्रो प्रकल्प १० हजार कोटी रुपयांचा, तर खर्चातील वाढ ही २० हजार कोटी रुपयांहून अधिक अशी परिस्थिती होईल. त्यामुळे आरेमध्येच कारशेड आवश्यक असून वर्षभराच्या आत काम पूर्ण होऊन मेट्रो रेल्वे लवकर सुरू होऊ शकेल. आता आरेतील आणखी झाडे तोडण्याची गरज नाही. जी कापणे आवश्यक होते, ती आधीच कापली गेली आहेत. त्यामुळे खऱ्या पर्यावरणवाद्यांचा कारशेडला अजून विरोध असेल, तर त्यांची समजूत काढली जाईल, असे फडणवीस यांनी नमूद केले.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघरमध्ये ६४ टक्के भूसंपादन झाले आहे. भूसंपादनाचे काम तातडीने मार्गी लावून हा प्रकल्प वेगाने पुढे जाण्यासाठी आवश्यक पावले टाकणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निर्णय सरसकट रद्द नाही : महाविकास आघाडी सरकारच्या अखेरच्या टप्प्यात घेण्यात आलेले निर्णय सरसकट रद्द केले जाणार नाहीत. जे निर्णय वादग्रस्त आहेत, सूडबुद्धीने घेतले आहेत, त्याचा अभ्यास करून ते रद्द केले जातील, असे सांगून एकनाथ शिंदे सरकारचा बहुमताचा प्रस्ताव विधानसभेत मोठय़ा मताधिक्याने सोमवारी मंजूर होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.