मुंबई: सहार विमानतळावर कार्यरत असलेल्या एका सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) अधीक्षकाला केंद्रीय अन्वेषण विभागाने ( सीबीआय) १० लाखांची लाच घेताना अटक केली आहे.सीबीआयकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सीमा शुल्क विभागाचे (कस्टम) अधीक्षक श्रीकृष्ण कुमार सहार विमानतळाच्या हवाई कार्गो विभाग कार्यरत होता. त्याने एका कस्टम हाऊस कंपनीकडून आयात केलेल्या मालाला मंजुरी (क्लिअरन्स) देण्यासाठी आयात मालाच्या वजनानुसार दर किलोमागे १० लाख रुपये लाचेची मागणी केली होती.
ही लाच त्याने स्वतःसाठी तसेच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्यावतीने मागितल्याचा आरोप आहे. कंपनीने लाच देण्यास नकार दिल्यावर संबंधित अधिक्षकाने धमकी दिली आणि माल मुद्दाम रोखून धरल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. याबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तक्रार करण्यात आली होती.
सीबीआयने २५ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान स्वतंत्र साक्षीदारांच्या उपस्थितीत पडताळणी केली. त्यात अधीक्षक श्रीकृष्ण कुमार याने याआधी मंजूर (क्लिअर) झालेल्या मालासाठी ६ लाख तर नव्या मालाच्या क्लिअरन्ससाठी १० लाखांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. शनिवार २ ऑगस्ट रोजी सीबीआयने सापळा रचून अधीक्षक श्रीकृष्ण कुमार याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून १० लाख २० हजारांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपी श्रीकृष्ण कुमार याला न्यायालयात हजर करण्यात आले असून ६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.