मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सुमारे ३ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीप्रकरणी शनिवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड कंपनीचे संचालक अनिल अंबानी यांच्या मुंबईतील दोन निवासस्थानी आणि कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकले. या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंबानी आणि रिलायन्स कंपनीविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
उद्योजक अनिल अंबानी हे रिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड कंपनीचे संलाचक आहेत. त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाची (एसबीआय) २ हजार ९२९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. बॅंकेने दिलेल्या तक्रारीवरून गुरूवारी रिलायन्स कम्युनिकेशन कंपनी आणि कंपनीचे संचालक अनिल अंबानी यांच्यासह अन्य जणांविरोधात कट रचून बँकेची फसवणूक, विश्वासघात या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात शासकीय अधिकारी आणि अन्य कंपनीच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी सीबीआयने विशेष सत्र न्यायालयाकडे परवानगीसाठी मागितली होती. सीबीआयने मुंबईतील अंबानी यांचे कफ परेड येथील निवासस्थान आणि रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीच्या कार्यालयावर शनिवारी छापे टाकले.
आरोप काय?
स्टेंट बॅंक ऑफ इंडियाने दिलेल्या तक्रारीत रिलायन्स कंपनीविरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीने बँकेकडून घेतलेले कर्ज भलत्याच ठिकाणी वापरून कर्जाची रक्कम विविध व्यवहारांद्वारे समुह कंपन्यांमध्ये वळवण्यात आल्याचा आरोप आहे. कंपनीने बोगस देणेकरी उभे केल्याचाही आरोप आहे. कंपनी रिलायन्स इन्फ्राटेलद्वारे बिलांमध्ये सवलत, नेटिझन इंजिनीअरिंग या अनिल अंबानींच्या समुहातील कंपनीस दिलेली भांडवली रक्कम माफ करणे आदी गैरव्यवहारांचा आरोप आहे. विशेष म्हणजे एसबीआयने नोव्हेंबर २०२० मध्ये हे कर्ज खाते आणि प्रमोटर अनिल अंबानी यांना काळ्या यादीत टाकले होते.