मुंबई : बोरीवली येथील पश्चिम द्रुतगती मार्गावर सिमेंट मिक्सर व खासगी टॅक्सीचा भीषण अपघात झाला असून वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे सिमेंट मिक्सर दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या टॅक्सीला धडकला. त्यामुळे टॅक्सीला आग लागली. या अपघातात टॅक्सी चालक मकसूद आलम शेख (५४) यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी दिनेश कुमार भारतीय घटनास्थळावरून पळून गेला, मात्र नंतर त्याला शोधून अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना गुरुवारी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास घडली. दिनेश कुमार भारतीय चालवत असलेला सिमेंट मिक्सर नॅशनल पार्क उड्डाणपुलावरून उत्तरेकडे जात होता. अपघाताच्या नेमक्या कारणाचा पोलीस तपास करत आहेत. प्राथमिक तपासात टायर फुटल्यामुळे मिक्सर २०० मिटर दूर फेकला गेल्याचा संशय आहे. या अपघातात विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन मोटरगाड्या थोडक्यात वाचल्या.

हेही वाचा…३८ लाख टन सोयाबीन कवडीमोल दरात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेखने एका प्रवाशाला सोडून विमानतळाकडे परतत होता. एका प्रवाशाला घेण्यासाठी तो जात असताना विरुद्ध दिशेने दुभाजक ओलांडून सिमेंट मिक्सर आला व त्याने टॅक्सीला धडक दिली. धडकेनंतर टॅक्सीला आग लागली आणि टॅक्सीचा पुढील भाग जळून खाक झाला. पोलिसांच्या मते, शेख यांना टॅक्सीतून बाहेर पडता आले नाही व होरपळून त्यांचा मृत्यू झाला. मृतेदाची ओळख पटवता आली नाही. पण त्या भागातून जाणाऱ्या इतर टॅक्सी चालकांनी शेख यांच्या टॅक्सीला जळताना पाहिले. त्यावेळी त्यांच्याकडून तो मृतदेह शेख यांचा असल्याचे पोलिसांना समजले. शेख यांच्या कुटुंबियांचा शोध घेण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी आहे. दरम्यान, पोलिसांनी सिमेंट मिक्सरच्या नोंदणी क्रमांकाची प्रादेशिक परिवहन कार्यालयातील माहितीशी पडताळणी करून मालकाचा पत्ता शोधला. मालकाच्या मदतीने त्यांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासणीत चालक दारूच्या अंमलाखाली वाहन चालवत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही याप्रकरणी वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.