वर्षभरात मध्य रेल्वेच्या प्रथम दर्जाच्या प्रवाशांमध्ये ४० लाखांची घट; तरीही १६५.५० कोटींचा महसूल

मध्य रेल्वेवरील प्रथम दर्जाच्या प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. वर्षभराच्या आकडेवारीची तुलना केल्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या तब्बल ४० लाखांनी कमी झाली आहे. असे असले तरी या वर्षांत रेल्वेच्या महसुलात मात्र वाढ झाली आहे. मुंबईत उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या ७५ लाख प्रवाशांपैकी ४० ते ४३ लाख प्रवाशांचा भार मध्य रेल्वे वाहत असते.

[jwplayer CdTbNsE8]

मध्य रेल्वेवर २०१४-१५ या वर्षभरात प्रथम दर्जाच्या डब्यामधून एकूण १३.२० कोटी प्रवाशांनी प्रवास केला. या प्रवाशांकडून मध्य रेल्वेला १६५.५० कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. तर २०१५-१६ या आर्थिक वर्षांत या मार्गावरील प्रथम दर्जाच्या प्रवाशांची संख्या १२.८० कोटी एवढी कमी झाली. म्हणजेच तब्बल ४० लाखांनी ही प्रवासी संख्या घटली. ही संख्या कमी झाली, तरी मध्य रेल्वेच्या तिजोरीत १६६.३० कोटी रुपये जमा झाले. अनेकांनी वार्षिक किंवा लांब पल्ल्याचे पास काढल्याने ही वाढ झाल्याचे दिसते.

प्रथम दर्जाच्या प्रवाशांबरोबरच द्वितीय श्रेणीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही ५५ लाखांनी कमी झाल्याची माहिती मिळते. २०१४-१५ या वर्षभरात मध्य रेल्वेवर १३०.६५ कोटी प्रवाशांनी प्रवास करत मध्य रेल्वेच्या तिजोरीत ६३३.९३ कोटी रुपये जमा केले. तर २०१५-१६ या वर्षांत प्रवाशांची संख्या ५५ लाखांनी कमी होऊन १३०.१० कोटी प्रवाशांनी मध्य रेल्वेवर प्रवास केल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या द्वितीय श्रेणीच्या प्रवाशांमध्ये घट होऊनही या श्रेणीतून मिळणारे उत्पन्न ६४६.९ कोटी एवढे झाले आहे.

 

लांबच्या टप्प्यासाठी तिकीटविक्री

मध्य रेल्वेचा पसारा ठाणे स्थानकापल्याड वाढला आहे. प्रवासी संख्येत वाढ झालेल्या स्थानकांमध्येही बदलापूर, दिवा, टिटवाळा, पनवेल, नेरूळ, कळवा, खारघर आदी स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे पूर्वी जवळच्या स्थानकांसाठी होणारी तिकीट विक्री लांबच्या टप्प्यासाठी होत असल्याने ही वाढ झाल्याचे चित्र आहे.

[jwplayer 9AX3hgPE]