मध्य रेल्वेवर मंगळवारी सकाळी आठ वाजता ठाणे स्थानकात एका लोकलच्या डब्यात बिघाड झाला लोकलसेवा दीड तास विस्कळीत झाली. अप धीम्या मार्गावरील गाडय़ा अप जलद मार्गावर वळवाव्या लागल्या. परिणामी जलद गाडय़ांची वाहतूकही दिरंगाईनेच सुरू होती. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी तासाभराचा अवधी लागला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा ते पाऊण तास उशिराने सुरू होती.
मध्य रेल्वेमार्गावर ठाणे स्थानकात सकाळी ८.०५च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर आलेल्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या धीम्या गाडीच्या एका डब्यात बिघाड झाला. त्यामुळे ही गाडी याच प्लॅटफॉर्मवर खोळंबून राहिली. या गाडीमागे तीन गाडय़ा धीम्या मार्गावर अडकून पडल्या. मात्र इतर अप धीम्या गाडय़ांची वाहतूक दिवा ते मुलुंड या स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरून चालवली जात होती. त्यामुळे अप जलद मार्गावरील गाडय़ांचे आधीच बिघडलेले वेळापत्रकही आणखी विस्कळीत झाले. सकाळी नऊ वाजता हा बिघाड दुरुस्त झाला.