मुंबई : मध्य रेल्वेवरील टिटवाळा-आंबिवलीदरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये गुरुवारी दुपारी तांत्रिक बिघाड झाला असून लोकलसेवा एक तास विलंबाने धावत आहेत. या बिघाडामुळे प्रवासी आणि गणेशभक्तांचे प्रचंड हाल झाले. कसाऱ्यावरून कल्याण दिशेने जाणाऱ्या लोकल एका मागे एक थांबल्याने प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचण्यास विलंब झाला.

मुंबई, ठाण्यातील मोठ्या मंडळाचे गणपतीचे दर्शन घेण्यासाठी, गणेशभक्त निघाले. परंतु, लोकलच्या कोलमडलेल्या वेळापत्रकामुळे गणेश भक्तांचे प्रचंड हाल झाले. कसारा, टिटवाळ्यावरून सीएसएमटीकडे निघालेल्या लोकल, टिटवाळा-आंबिवलीदरम्यान उभ्या होत्या. कसाऱ्यावरून सीएसएमटीकडे येणारी रेल्वे सेवा ठप्प झाली. तसेच सीएसएमटीवरून कसाऱ्याकडे येणारी लोकल धिम्यागतीने धावत आहेत. या घटनेची माहिती मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाला कळताच, मालगाडी मार्गस्थ करण्याचे काम आणि लोकल सेवा पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आले.