मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे उपनगरीय सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. गुरुवारी सायंकाळी सहानंतर घाटकोपर स्थानकाजवळ अप धीम्या मार्गावर एका लोकलच्या पेन्टाग्राफमध्ये बिघाड झाला. वीस मिनिटे झालेल्या या बिघाडामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलची सेवा ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली. त्याचा परिणाम सीएसएमटीतून सुटणाऱ्या लोकल गाड्यांवरही झाला. अद्यापह प्रवाशांचे हाल होत असून लोकल विलंबाने धावत आहेत.
घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ सायंकाळी ६.०५ वाजता कल्याण-सीएसएमटी धीम्या लोकलचा पेन्टाग्राफमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी तब्बल वीस मिनिटे लागली. त्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलचे वेळापत्रकच विस्कळीत झाले. या लोकलमागे अन्य लोकलही रांगेत उभ्या राहिल्या. सीएसएमटीच्या दिशेने लोकल उशिरा पोहोचत असल्याने त्याचा परिणाम सीएसएमटीतून सुटणाऱ्या लोकल गाड्यांवरही झाला आहे. धीम्या मार्गावरील लोकल वीस मिनिटांहून अधिक उशिराने धावत असून त्यामुळे अनेक स्थानकांवर गर्दी आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवरील लोकल वेळापत्रक विविध कारणांनी विस्कळीत होत आहे. मध्य रेल्वेच्या दोन्ही धीम्या मार्गावरील लोकल सेवेचे वेळापत्रक गुरुवारी कोलमडले. प्रवाशांना पुन्हा मनस्तापाला सामोरे जावे लागले.