तान्ह्य़ा बाळांसह प्रवास करणाऱ्या महिलांचा प्रवास सुखकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेल्वे प्रवासासाठी गाडीच्या वेळेच्या खूप आधी घर सोडले आहे, सोबत तान्हे बाळ असून संपूर्ण प्रवासभर त्याच्या खाण्यापिण्याचे काय, स्वच्छ पाणी मिळेल का.. अशा असंख्य प्रश्नांचा सामना करणाऱ्या मातांसाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या पुढाकारातून ‘जननी सेवा’ सुरू झाली आहे. २०१६-१७च्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वेमंत्र्यांनी घोषित केलेली ही सेवा मध्य रेल्वेवरील २९ स्थानकांवर सुरू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे तान्ह्य़ा बाळांसाठी गरम दूध, स्वच्छ गरम पाणी आणि इतर पोषक आहार उपलब्ध होणार आहे.

लहान बाळांसह प्रवास करायचा म्हणजे पालकांना त्या बाळाच्या कपडय़ांची एक बॅग आणि प्रवासादरम्यान बाळाला लागणाऱ्या इतर महत्त्वाच्या गोष्टींबरोबर त्याच्या आहारासाठी वेगळी बॅग, अशा दोन बॅगा बरोबर बाळगाव्या लागतात. लहान बाळांना प्रामुख्याने दूध आणि इतर पोषक आहार दिला जातो. नेमके हेच पदार्थ रेल्वेच्या प्रवासादरम्यान उपलब्ध नसल्याने आणि असले, तरी त्यांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह असल्याने पालकांच्या समस्येत भर पडते. त्यातही तान्ह्य़ा बाळांसह प्रवास करणाऱ्या महिलांना जास्त मनस्ताप होतो. या गोष्टीवर लक्ष देत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१६-१७च्या अर्थसंकल्पात ‘जननी सेवा’ सुरू करण्याची घोषणा केली होती. या सेवेअंतर्गत स्थानकांवर लहान बाळांसाठी गरम दूध, गरम पाणी आणि इतर पोषक आहाराची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. तसेच प्रवासादरम्यानही गाडीत हे पदार्थ उपलब्ध होतील, असेही रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.

 

‘जननी सेवा’ देणारी स्थानके

छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, इगतपुरी, कर्जत, लोणावळा, पनवेल, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, खांडवा, बऱ्हाणपूर, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, नांदगाव, नागपूर, वर्धा, बल्लारशाह, बेतूल, पुणे, मिरज, कोल्हापूर, सोलापूर, दौंड.

‘जननी सेवे’ची सुरुवात आता मध्य रेल्वेवर करण्यात आली आहे. ही ‘जननी सेवा’ सशुल्क असून २९ स्थानकांवर सुरू झालेली ही सेवा लवकरच सर्व स्थानकांवर उपलब्ध करून दिली जाईल.

– नरेंद्र पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway janani service
First published on: 13-06-2016 at 02:32 IST