मुंबईकरांच्या धावपळीचे वेळापत्रक बिघडू नये यासाठी धडधडणाऱ्या मध्य रेल्वेलाच सध्या मरगळ आली आहे. रोज कोणत्या ना कोणत्या कारणास्तव मुंबईकरांची ही जीवनवाहिनी स्वतचेच वेळापत्रक पाळू शकत नाही. त्यात सोमवारच्या दिवसाची भर पडली. सोमवारी तीन वेगवेगळ्या कारणांमुळे दिवसभर हार्बर व मुख्य मार्गावरील सेवा विस्कळीत झाली होती. यातील दोन बिघाड मुख्य मार्गावर घडले. सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी दिवा स्थानकाजवळ रेल्वे डब्यातील बिघाडामुळे सात सेवा रद्द झाल्या तर कल्याण-कसारा मार्गावरील वाहतूक तासाभरापेक्षाही अधिक काळ विस्कळीत झाल्याने  चाकरमान्यांचे हाल झाले.

पहिले कारण..
पहाटे साडेपाचच्या सुमारास कसारा मार्गावरील आटगाव स्थानकाजवळील रेल्वे फाटक ठरावीक वेळेत बंद करण्यास स्थानिकांनी मज्जाव केला. खासगी गाडय़ांना रेल्वेमार्ग ओलांडून जाता यावे, यासाठी हे फाटक आठ मिनिटांपेक्षा जास्त उघडे ठेवण्यात आले. त्यामुळे दोन उपनगरीय गाडय़ा आणि दुरांतो एक्स्प्रेस अशा तीन गाडय़ा एकामागोमाग एक खोळंबल्या. रेल्वे फाटक हाताळणाऱ्या कर्मचाऱ्याला काही अज्ञात व्यक्तींनी जबरदस्तीने हे फाटक जास्त काळ उघडे ठेवण्यास भाग पाडल्याचे प्रशासनाने सांगितले.

दुसरे कारण..
अंबरनाथहून मुंबईला निघालेल्या जलद गाडीच्या एका डब्यात तांत्रिक बिघाड झाला. ही गाडी संध्याकाळी सहाच्या सुमारास दिवा-पारसिक दरम्यान बंद पडली. पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ ही गाडी जागीच थांबून राहिली होती. त्यानंतर ही गाडी ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर आणून रद्द केली. मात्र यामुळे अप जलद मार्गावरील वाहतुकीचे तीनतेरा वाजले.

तिसरे कारण..
हार्बर मार्गावर वडाळा स्थानकात तिसरी घटना घडली. या घटनेत जमिनीखालून जाणाऱ्या एका वायरमध्ये लघुपथन (शॉर्ट सर्किट) झाल्याने पूर्ण स्थानकात धूर पसरला. त्यामुळे हार्बरवरील एक गाडी ११ मिनिटे जागीच थांबवण्यात आली.  त्याचा इतर गाडय़ांच्या वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

प्रवासी संघटनांची तक्रार
मध्य रेल्वेचे नवे वेळापत्रक मुद्रित किंवा ‘एम इंडिकेटर’ स्वरूपात प्रवाशांपर्यंत पोहोचलेले नाही. मात्र त्याआधीच रेल्वेने या वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू केली आहे. गेली दोन वर्षे वेळापत्रकात फार बदल झाले नव्हते. यंदा मात्र, प्रत्येक गाडीची वेळ बदलल्याने प्रवाशांना ‘आपली’ गाडी आता नेमकी कधी येणार, याबाबत काहीच कल्पना नाही.