मुंबई : मुंबई विद्यापीठाने सामाजिक समता, समावेशक प्रशासन आणि प्रशासकीय नेतृत्व विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या “अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय व पीएम केअर्स बालक योजना लाभार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन योजना” या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत मुंबई विद्यापीठात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स’ची स्थापना करण्यास मंजुरी दिली.

या केंद्राच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, तसेच इतर केंद्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, मार्गदर्शन, अध्ययनसामग्री आणि वैयक्तिक सल्ला आणि समुदेशनाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. ही योजना अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांसह पीएम केअर्स बालक योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये प्रशासकीय सेवांमध्ये प्रवेश मिळविण्याच्या संधी वृद्धींगत करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

मुंबई विद्यापीठाची गौरवशाली परंपरा, शैक्षणिक उत्कृष्टता आणि सक्षम पायाभूत सुविधांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या डॉ. आंबेडकर फाउंडेशनने मुंबई विद्यापीठात हे केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत स्थापन होणारे हे केंद्र महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय आणि पीएम केअर्स योजनेतील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे, नियोजनबद्ध मार्गदर्शन प्रदान करणारे एक सक्षम प्रशिक्षण व्यासपीठ ठरेल. या उपक्रमाद्वारे मुंबई विद्यापीठ सामाजिक न्याय, समान संधी आणि शैक्षणिक समावेशनाचे मूल्य दृढ करत असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आविष्कार शैक्षणिक क्षेत्रात साकारत आहे. हे केंद्र केवळ प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी व नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करेल.

मुंबई विद्यापीठात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन होणे हे सामाजिक न्याय आणि समावेशक शिक्षणाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल आहे. या केंद्राच्या माध्यमातून वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळून ते प्रशासकीय व सार्वजनिक सेवांमध्ये अधिक प्रभावीपणे सहभागी होऊ शकतील. हे केंद्र स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सेवाभाव विकसित करेल.प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ