मुंबई : एअर इंडियाची नरिमन पॉइंट येथील आलिशान २३ मजली इमारत १६०० कोटींना राज्य सरकारला विकण्यास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला असून उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या खरेदी व्यवहारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने सन २०१३ मध्ये एअर इंडियाचे मुंबईतील मुख्यालय दिल्लीत हलविण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईतील ही सुमारे पाच लाख चौरस फूट क्षेत्रफळाची इमारत विक्रीस काढली होती. ही इमारत मंत्रालयाच्या जवळच असल्याने तसेच मंत्रालयातील जागेची टंचाई लक्षात घेता ही इमारत उपयोगी पडणार आहे. 

हेही वाचा >>> आता ओबीसींची आंदोलनाची हाक; मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्याविरोधात दिवाळीनंतर रस्त्यावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 सुरुवातीस १४५० कोटींची बोली लावण्यात आली होती. मात्र या इमारतीची मालकी असलेल्या एअर इंडिया असेट्स होल्डिंग लि. या कंपनीने सुरुवातीस राज्य सरकारचा प्रस्ताव अमान्य केला होता.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरी उड्डयणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन एअर इंडियाची इमारत राज्य सरकारलाच देण्याची विनंती केली होती. त्यानंतर राज्य सरकारने या इमारतीसाठी लावलेली १६०० कोटींची बोली एअर इंडिया असेट्स होल्डिंग लि. या कंपनीने तसेच केंद्र सरकारने मान्य केली असून ही इमारत राज्य सरकारला देण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यानुसार ही इमारत खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार असून त्याला मान्यता मिळाल्यानंतर खरेदी प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.