मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात केली आहे. विद्यार्थांना प्रवेश प्रक्रियेदरम्यान अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी सीईटी कक्षाने राज्यातील विविध ठिकाणी संवाद कार्यशाळांचे आयोजन केले होते. नुकतेच छत्रपती संभाजी नगर व नागपूर येथे झालेल्या संवाद कार्यशाळेमध्ये विद्यार्थी व महाविद्यालयांकडून प्रवेश नियामक प्राधिकरणविरोधात (एआरए) तक्रारींचा पाढा वाचला. प्रवेश मान्यतेस होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एआरएच्या कामकाजासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यानंतर शैक्षणिक वर्षामध्ये ३१ जानेवारीपर्यंत या प्रवेशांना एआरएकडून मान्यता देणे बंधनकारक असते. विहित मुदतीमध्ये महाविद्यालयांकडून अर्ज पाठविल्यानंतरही त्यांना मान्यता मिळण्यास विलंब होत आहे. विद्यार्थ्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही प्रवेशास मान्यता दिली जात नाही. प्रवेशास मान्यता मिळावी यासाठी एआरएच्या कार्यालयामध्ये वारंवार फेऱ्या मारूनही तेथील कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर दिले जात नाही. एआरएकडून शुल्क वेळेवर भरून घेतल्यानंतरही मान्यता देण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकांकडून संवाद कार्यशाळांमध्ये करण्यात आल्या.
मागील काही वर्षांमध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशास एआरएने वेळेवर मान्यता दिली नाही. यातील बहुतांश विद्यार्थ्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण होऊन एक ते दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी त्यांच्या प्रवेशास मान्यता मिळाली नसल्याने त्यांना पदवी प्रमाणपत्र व निकाल मिळालेला नाही. परिणामी, उच्च शिक्षण व नोकरीच्या संधीपासून वंचित राहावे लागल्याबद्दल विद्यार्थी व पालकांनी संताप व्यक्त केला.
विद्यार्थ्यांकडून टीका
प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया राबविल्यानंतर कार्यशाळा घेण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांकडून सीईटी कक्षावर टीका केली. नोंदणी करताना नोंदणी पूर्ण झाल्याचा संदेश आला. त्यामुळे नोंदणी पूर्ण झाल्याचे समजून एमबीएच्या विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन पडताळणी केली नाही. त्यामुळे जवळपास १० ते १५ विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेसाठी अपात्र ठरल्याचे नागपूर येथील कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे सीईटी कक्षाने नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी कार्यशाळा घेतली असती तर आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळाले असते, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
सीईटी कक्षाला ग्रामीण भागाचे वावडे
सीईटी कक्षातर्फे दरवर्षी संवाद कार्यशाळा घेण्यात येतात. मात्र या कार्यशाळा साधारणपणे शहरी भागामध्ये घेतल्या जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालकांना या कार्यशाळांचा फारसा लाभ घेता येत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान हाेत असल्याचे महाराष्ट्र कॉलेज नर्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार यांनी सांगितले.