विदर्भ एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचणाऱ्या चोरटय़ाला प्रवाशांनी पकडून कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिल़े  चोरीचा पुरावा राहू नये म्हणून चोरटय़ाने ही सोनसाखळी गिळल्याचे बुधवारी पोलीस तपासात उघड झाल़े
डॉ. शीतल कांबळे सोमवारी विदर्भ एक्स्प्रेसने प्रवास करीत होत्या. त्या वेळी दामू पराग गुप्ता याने खिडकीतून हात घालून कांबळे यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढला. कांबळे यांनी आरडाओरडा करताच प्रवाशांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, त्याची झडती घेऊनही सोनसाखळी न सापडल्याने पोलिसही चक्रावले होते. आपण चोरी केली नसल्याचा दावा गुप्ता करत होता़  अखेर त्याची सोनोग्राफी केली असता त्याच्या पोटात धातू असल्याचे स्पष्ट झाल़े  त्यानंतर त्याने सोनसाखळी गिळल्याची कबुली दिल्याचे कल्याण रेल्वे पोलिसांनी सांगितले.