राज्यातील शिक्षणव्यवस्था ही निवडणूकग्रस्त झाली असून बहुतेक विद्यापीठांमधील अधिकारीही निवडणुकांच्या कामी गुंतले आहेत. त्यामुळे विद्यापीठांचे संपूर्ण वर्षभराचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे. शाळाही यातून सुटल्या नसून खेडेगावांमधील कमी शिक्षक असलेल्या शाळा या बंदही करता येत नाहीत आणि सुरूही ठेवता येत नाहीत अशा अवस्थेत आहेत.
जनगणना, निवडणूक या कामांसाठी शिक्षकांना जुंपण्याची प्रथा काही नवी नाही. मात्र, या वेळी ऐन परीक्षांच्या काळात आलेल्या निवडणुकांनी संपूर्ण शिक्षणव्यवस्थेला वेठीस धरले आहे. राज्यातील बहुतेक महाविद्यालयांमधील ७० टक्के शिक्षकांना निवडणुकीची कामे आहेत. त्याचबरोबर राज्यातील दहा विद्यापीठांमधील ६० टक्क्य़ांपेक्षा अधिक अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे लावण्यात आली आहेत. अमरावती, मराठवाडा, नांदेड, कोल्हापूर, सोलापूर या विद्यापीठांमधील ६० ते ७० टक्के कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे काम देण्यात आले आहे. सर्वाधिक विद्यार्थीसंख्या असलेल्या पुणे, मुंबई विद्यापीठामधील ९० टक्के कर्मचारी हे निवडणुकांच्या कामावर आहेत. यामध्ये उप-कुलसचिव दर्जाचे अधिकारी, परीक्षा विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे उरलेल्या तुटपुंज्या मनुष्यबळामध्ये परीक्षा घ्यायच्या कशा, असा प्रश्न विद्यापीठांपुढे आहे. निवडणुका झाल्यानंतर परीक्षांचे नियोजन करायचे झाल्यास पुढे निकाल, प्रवेश आणि पुढील परीक्षांचे नियोजन कोलमडणार आहे. नागपूर, जळगाव विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना अजूनही निवडणूक आयोगाकडून नेमणूकपत्रे आलेली नाहीत. त्यामुळे परीक्षांचे नियोजन कसे करायचे याबाबत अजूनही अनिश्चितता असल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले. जवळपास सर्वच विद्यापीठांनी परीक्षा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीची कामे देऊ नयेत अशी निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती केल्याचे सांगितले. राज्यातील महाविद्यालयांमध्येही प्राचार्यापासून शिपायांपर्यंत सर्वानाच निवडणुकीची कामे लावण्यात आली आहेत.
त्यामुळे महाविद्यालयांकडूनही  परीक्षा घेण्यात असमर्थता व्यक्त होत आहे.
राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची अवस्था तर बिकटच आहे. छोटय़ा, कमी शिक्षक असलेल्या शाळा बंदही करता येत नाहीत आणि सुरूही ठेवता येत नाहीत अशा परिस्थितीत आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांचे दिवस पूर्ण होत नसल्यामुळे शाळांना सुट्टी देता येत नाही. शाळापरीक्षांची वेळापत्रके तर पूर्णपणे कोलमडली आहेत. नुकत्याच झालेल्या जनगणनेच्या कामातून नि:श्वास सोडणारी शिक्षणव्यवस्था निवडणुकीच्या कामात अडकली आहे.

निवडणूक कामावरील कर्मचारी
मुंबई विद्यापीठ -९५० पैकी ८६०
पुणे विद्यापीठ – ६२७ पैकी ५९०
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – ५९० पैकी ३७०
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ – ५५० पैकी साधारण ४००
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड – २८५ पैकी साधारण १७०
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – ४८० पैकी साधारण २५०.