मुंबई : सीबीआयचे महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे  निवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र कुमार त्रिवेदी यांनी जयस्वाल यांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

भ्रष्टाचार विरोधी प्रकरणांच्या तपासाचा जयस्वाल यांना कोणताही पूर्वानुभव नाही. तसेच त्यांची विश्वासहर्ता संशयातीत आहे, असा दावा त्रिवेदी यांनी याचिकेत केला आहे.  केंद्रीय दक्षता आयोग कायद्यानुसार सीबीआय संचालकपदी नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्याला भ्रष्टाचार विरोधी प्रकरणांच्या तपासाचा पूर्वानुभव असणे अनिवार्य आहे. जयस्वाल यांच्या बाबतीत हे म्हणता येणार नाही, असा दावाही त्रिवेदी यांनी केला आहे.

आपण महाराष्ट्र पोलिस सेवेत कार्यरत असताना जयस्वाल यांच्या सांगण्यावरून  अचानक आपली गैरसोयीच्या पदावर बदली करण्यात आली होती. नंतर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने बदलीचा निर्णय रद्द केला होता, असेही त्रिवेदी यांनी याचिकेत म्हटले आहे.  अ‍ॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत त्रिवेदी यांनी ही याचिका केली आहे.