लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात उन्हाचा तडाखा वाढला असून काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, पालघरमध्ये सोमवारी, तर ठाणे परिसरात सोमवार, मंगळवारी पावसाच्या हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबई शहर, तसेच उपनगरांत असह्य उकाडा जाणवू लागला असून नागरिक हैराण झाले आहेत. तसेच शहरात रात्रीही प्रचंड उष्णता अनुभवायला मिळत आहे. दरम्यान, कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आणि दक्षिण तामिळनाडूपासून आग्नेय मध्य प्रदेशापर्यंत हवेची द्रोणीय रेषा निर्माण झाली आहे. याचाच एकत्रित परिणाम म्हणून पालघर आणि ठाणे भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

आणखी वाचा-मुंबई: दहिसरमध्ये विवाहित महिलेची आत्महत्या, पती व सासूविरोधात गुन्हा दाखल

मुंबईत पुढील पाच दिवस कमाल तापमान ३१-३५ अंश सेल्सिअसदरम्यान राहील. मात्र हवेतील आर्द्रतेत वाढ होऊन उकाडा वाढणार आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३१ अंश सेल्सिअस, तर सांताक्रुझ केंद्रात ३५.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रुझ केंद्रात कमाल तापमान २ अंशानी अधिक नोंदले गेले.