मुंबई: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबईत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच १३ ते १५ जून दरम्यान हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केला आहे. ठाणे तसेच पालघर जिल्ह्यात देखील १३ ते १५ जून दरम्यान हलक्या सरींची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहून, विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

दरम्यान, रविवारी मुंबईत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. रविवारी सायंकाळी दक्षिण मुंबईत तसेच नवी मुंबईत हलक्या पावसाने हजेरी लावली. मुंबईत शनिवारीही हलक्या सरी पडल्या.

आणखी वाचा-मुंबई: आज दुपारी १ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी करता येणार

नवी मुंबईत सकाळपासून जोरदार वारे वाहू लागले आहेत. तसेच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, रविवारी रात्री नवी मुंबईत पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली होती.