मुंबईच्या अनेक भागांमध्ये शनिवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक भागांमध्ये तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अनेक भागांमध्ये घरांमध्ये देखील पाणी शिरल्याचं दिसून आलं. मात्र, चेंबूरमध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआयनं दिली आहे. पावसाच्या परिणामामुळे दरड भिंतीवर कोसळल्यामुळे ही भिंतच कडेच्या घरांवर कोसळली. यामध्ये २१ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. ६ जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आलं आहे. त्यासोबतच विक्रोळीमध्ये घडलेल्या दुसऱ्या घटनेमध्ये एक दुमजली इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

 

चेंबूरच्या आरसीएफ परिसरातल्या भारत नगरमध्ये ही दुर्घटना घडली. मध्यरात्री १२.३० ते १ च्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर स्थानिकांनी तातडीने वैयक्तिक पातळीवर बचावकार्य सुरू केलं. त्याच वेळी बचाव यंत्रणेला देखील माहिती देण्यात आली. त्यामुळे माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. या भागात सकाळी पावसाचं प्रमाण जरी कमी झालं असलं, तरी पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर चिखल झाला. त्यामुळे बचावकार्य करण्यात एनडीआरएफच्या जवानांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. घरांच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगरामुळे नेहमीच या भागातील अशा दुर्घटनेची शंका उपस्थित केली जात होती. मध्यरात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत ५ ते ८ घरांवर कोसळली आणि मलब्याखाली या घरांमध्ये राहणारे लोक दबले गेले.

घटनास्थळावरील सकाळचा व्हिडीओ

एनडीआरएफनं दिलेल्या माहितीनुसार, या भागामध्ये ५० मीटरच्या अंतरावर दोन घटना घडल्या आहेत. यामध्ये एका घटनेत दरड कोसळली असून दुसरीकडे बीएआरसीची भिंत कोसळली आहे. या दोन्ही घटनांमध्ये मिळून आत्तापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जणांचा वाचवण्यात बचाव पथकांना यश आलं आहे.

दरम्यान, एकीकडे चेंबूरमध्ये २१ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता मुंबईच्या विक्रोळी परिसरातून अशीच एक घटना घडल्याची माहिती मिळत आहे. विक्रोळीच्या सूर्यनगर परिसरामध्ये एक दुमजली इमारत कोसळल्यामुळे ६ जणांचा मृत्यू गेल्याचं समोर आलं आहे. घटनास्थळी बचावपथकं दाखल झाली असून अजूनही कुणी मलब्याखाली दबलं आहे का? याचा शोध बचाव पथकाच्या माध्यमातून घेतला जात आहे.

भांडुपमध्ये भिंत कोसळून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

चेंबूर आणि विक्रोळीप्रमाणेच भांडुपमध्ये देखील अशाच प्रकारची एक दुर्घटना घडली आहे. भांडुपमध्ये संरक्षक भिंत कोसळून एका १६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून सोहम थोरात असं या मुलाचं नाव आहे. भांडुपच्या अमरकोट भागामध्ये वनविभागाची भिंत कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. हा मुलगा घरात आलेलं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी डोंगरावरचे दगड आणि माती खाली आली. स्थानिक रहिवाशांनी प्रयत्न करून त्याला बाहेर काढलं खरं. पण त्याचा मृत्यू झाल्याचं नंतर जाहीर करण्यात आलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chembur news landslide incident amid heavy rainfall in mumbai cased water logging pmw
First published on: 18-07-2021 at 08:06 IST