Heavy Rainfall in Maharashtra मुंबई: पूर्व उपनगरातील चेंबूर परिसरात रविवारी सायंकाळी डोंगरावर बांधलेली एक संरक्षण भिंत अचानक काही झोपड्यांवर कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. मात्र यामध्ये सात झोपड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. परीणामी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडत आहेत. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास अशाच प्रकारे चेंबूर वाशीनाका येथील अशोक नगर परिसरातील डोंगरावर एमएमआरडीएने बांधलेली एक संरक्षण भिंत अचानक खाली असलेल्या काही झोपड्यांवर कोसळली. सुदैवाने नागरिकांच्या ही बाब तत्काळ लक्षात आल्याने त्यांनी घराबाहेर धाव घेतली. त्यामुळे याठिकाणी मोठी दुर्घटना घडली नाही.

अग्निशमन दल आणि पालिकेला याची माहिती मिळताच तत्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर झोपड्यांवर पडलेला संरक्षण भिंतीचा मलबा काढून टाकण्यात आला. सध्या दुर्घटनाग्रस्त झोपडीधारकांची पालिकेने मरवली चर्च परिसरात तात्पुरती राहण्याची सोय केली आहे. याच भागात २०२१साली एक संरक्षण भिंत कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र अद्यापही डोंगरावर राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन न झाल्याने त्यांना आशा प्रकारे धोकादायक परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागते आहे.