मुंबई : चेंबूर येथील शीव – ट्रॉम्बे मार्गावरील कॉर्पोरेट पार्क इमारतीतील थॉमस कुक या कार्यालयात रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अचानक आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सलग दुसऱ्या दिवशीही मुंबईत आगीची घटना घडली. अंधेरीत शनिवारी मध्यरात्री होंडा शोरुमलाही भीषण आग लागली होती. अग्निशमन दल सुमारे पाच तास आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. त्यांनतर रविवारी मध्यरात्री चेंबूरमधील थॉमस कुक या कार्यालयात भीषण आग लागली. दुर्घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, आगीने धारण केलेले अक्राळ विक्राळ रूप पाहून अग्निशमन दलाने १.५५ च्या सुमारास आग भीषण स्वरूपाची (वर्दी क्र.१) असल्याचे घोषित केले.
आगीच्या धुरामुळे मदतकार्यात अग्निशामकांना अडथळे येत होते. तसेच, आगीची तीव्रताही सातत्याने वाढत होती. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील २ हजार चौरस फूट जागेत आग लागली होती. विद्युत यंत्रणा विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने आगीची मोठा भडका उडाला. आगीत कार्यालयातील लाकडी सामान, कागदपत्रे, यूपीएस बॅटरी बॅकअप, छत, दरवाजे आदी सामान जळून खाक झाले. त्यानंतर अग्निशमन दलातर्फे रात्री २.५० च्या सुमारास आगीला क्रमांक २ ची वर्दी देण्यात आली. प्रयत्नांची पराकाष्ठा करत पहाटे साडे चारच्या सुमारास आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सकाळी ६.१५ च्या सुमारास कुलिंग ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर घटनास्थळावरून अग्निशमन दल परतले.
