अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर “आज आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. यावेळी छगन भुजबळ यांनीही प्रसारमाध्यमांधी संवाद साधला आहे.
छगन भुजबळ म्हणाले, ” आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच म्हणूनच सरकारमध्ये सामील झालो आहोत. राज्यातील शेतकरी, बेरोजगारांचे प्रश्न सोडवायचे असतील, तर आपल्याला फक्त भांडण करून चालणार नाही. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे.”
हेही वाचा : ‘चिखल’: राज ठाकरेंची महाराष्ट्रातील राजकारणावर मार्मिक प्रतिक्रिया
“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आम्हीही टीका केली आहे. पण, देशाचे नेतृत्व मोदींच्या हातात सुखरूप आहे, हे नाकारता येत नाही. महाराष्ट्र असो किंवा देशात विकासकामांबाबत तातडीने निर्णय घेऊन समाधान करण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदींनी केला आहे,” असं छगन भुजबळांनी सांगितलं.
हेही वाचा : राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, पक्षावर दावा करत म्हणाले, “अनेक दिवस याबाबत…”
“लोक आरोप करतात, यांच्यावर केसेस आहेत म्हणून गेले. अजित पवारांवरील केसेस बंद झाल्या आहेत. माझ्यावरील केसही बंद झाली आहे. अनिल पाटील, आदिती तटकरे, धर्मरावबाबा आत्राम, दिलीप वळसे-पाटील, संजय बनसोडे यांच्यावरही केस नाही. फक्त हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप ठेवून कठोर कारवाई करण्यात आली नाही. न्यायालय तारखा पुढे ढकलत आहे. कारण, त्यांच्याविरोधात मजबूत असे पुरावे मिळत नाही,” असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.