मुंबई : पाकिस्तानात लपून बसलेला छोटा शकीलचा भाऊ अन्वर बाबू मुंबईत ड्रग्स निर्मितीत मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा (फंडिंग) करीत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. देशभरात मेफेड्रोनसारख्या (एमडी) रासायनिक अमली पदार्थाच्या उत्पादनात दाऊद टोळीची गुंतवणूक असल्याचा संशय असून नुकत्यात परदेशातून प्रत्यार्पण करून भारतात आणलेल्या आरोपींच्या चौकशीत याप्रकरणी अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे.
कोण आहे अन्वर बाबू ?
अन्वर बाबू शेख १९८४ साली भारतातून फरार होऊन पाकिस्तानात पळून गेला होता. त्याच्यावर खून, खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका बांधकाम व्यावायिकाला २०२१ मध्ये धमकावण्याच्या प्रकरणातही सहभाग असल्याची माहिती मिळाली होती. अन्वर छोटा शकीलचा भाऊ आहे.
कोणती माहिती पोलिसांच्या हाती ?
आरोपी ताहिर डोलाचे प्रत्यर्पण अमली पदार्थ विरोधी मोहिमेतील भारताचे मोठे यश मानले जाते. आरोपीचे वडील सलीम डोला हाही अंमली पदार्थ तस्करीच्या अनेक गुन्ह्यांत सहभागी होते. ताहिर मोठ्या प्रमाणात एमडीची निर्मिती करीत होता. त्याच्या सूचनेनुसार सुरू असलेल्या विविध कारखान्यांमध्ये १० दिवसांमध्ये २०० किलो एमडीची निर्मिती होत होती. दोन वर्षांपासून तो एमडी निर्मितीत सक्रिय होता. सलीम डोलाचे दाऊद टोळीशी संबंध असल्याचे आरोप त्यावेळी झाले होते. गुन्हे शाखेने नुकतीच यूएई येथून सलीमचा मुलगा ताहिर डोला आणि पुतण्या मुस्तफा कुब्बावाला यांना अटक करून भारतात आणले आहे.
अपहरणाच्या प्रकरणात अन्वरचे नाव
दाऊद टोळीशी संबंधित संशयीत टोळीकडून अपहरण करण्यात आलेल्या शब्बीर सिद्दीकीने याबाबत माहिती दिली होती. त्याला अपहरण करणारा सरवर खान हा त्या टोळीचा म्होरक्या होता. सरवर त्याला मारहाण करताना “तुला माहित नाही का, मी छोटा शकीलचा भाऊ अन्वरसाठी काम करतो. तुला दिलेले पैसे अन्वरचे आहेत. पैसे दिले नाही, तर तुला जिवंत ठेवणार नाही,असे धमकावत होता. यावेळी या टोळीने शब्बीर व अमली पदार्थ निर्मितीत सहभागी असलेल्या साजीद इलेक्ट्रीकवाला यांचे अपहरण केले होते. त्यावेळी त्यांना पट्टा आणि लाकडी काठ्यांनी मारहाण करण्यात आली, नग्न करून नाचवले आणि त्याचे चित्रीकरण करण्यात आले. सरवर खानने असेही सांगितले की,अन्वर भाई एमडी (ड्रग्ज) विकत घेण्यासाठी पैसे पुरवतो आणि उमेदुर रहमान व सलीम डोला हे त्याची विक्री करतात.
काय आहे प्रकरण ?
अमली पदार्थ निर्मितीच्या एका प्रकरणात आरोपी असलेल्या साजिद इलेक्ट्रिकवाला याचे अपहरण दाऊदशी संबंधित टोळीने केले होते. याप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या कक्ष-३ च्या पोलिसांनी त्याची सुटका उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून केली होती. इलेक्ट्रीकवालाला या टोळीने ३० दिवसांहून अधिक काळ डांबून ठेवले होते. इलेक्ट्रीकवाल्याला दाऊद टोळीशी संबंधित सरवरने ५० लाख रुपये होते. एमडी हे अमली पदार्थ बनवण्यासाठी ती रक्कम देण्यात आल्याचा आरोप आहे. पण इलेक्ट्रीकवालाने ती रक्कम परत केली नाही. त्यानंतर त्याचे अपहरण करून आरोपींनी ५० लाखांंची खंडणी वसूल केली. त्यानंतर आणखी तीन कोटी रुपयांची मागणी केली. गुन्हे शाखा आता या संपूर्ण टोळीच्या पार्श्वभूमीचा तपास करीत असून, छोटा शकीलचा भाऊ अन्वर, सलीम डोला आणि इतर संबंधितांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.