मटका व्यवसाय करणाऱ्या व सर्वच संघटित गुन्हेगारी टोळ्यांना अर्थसाहाय्य पुरवणाऱ्या म्हणजेच हप्ता पोच करणाऱ्या पंकज गंगर (५४) याला ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली. इकबाल कासकर प्रकरणातली ही चौथी अटक आहे. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांना धमकावण्यासाठी इकबाल व त्याच्या साथीदारांनी जी शस्त्रे वापरली ती पंकजने पुरवली किंवा त्यासाठीचे अर्थसाहाय्य पंकजने केले, असा आरोप खंडणीविरोधी पथकाने ठेवला आहे.
बोरिवलीच्या चामुंडा चौकात राहणाऱ्या पंकजला ठाणे दंडाधिकारी न्यायालयाने ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. खंडणीविरोधी पथकाने न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार पंकज कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा विश्वासू हस्तक छोटा शकील, भाऊ इकबालच्या सतत संपर्कात आहे. शकील व इकबालच्या हस्तकांना पंकज दरमहा १२ लाख रुपये पुरवतो. पंकजने पुरवलेल्या अर्थसाहाय्याचा उपयोग शकील व इकबालचे हस्तक बंदूक विकत घेण्यासाठी करतात. या प्रकरणातील तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाला धमकावण्यासाठी इकबालच्या साथीदारांनी ज्या बंदुकीचा वापर केला ती पंकजने पुरवलेल्या पैशातून विकत घेतल्याची माहिती पुढे येत आहे. अॅड. मंगेश नलावडे यांनी पंकजच्या वतीने दंडाधिकारी न्यायालयात बाजू मांडली. छोटा शकील किंवा इकबाल कासकर यांच्याशी व त्यांच्या गुन्हेगारी जगताशी पंकजचा संबंध नाही. अटक केलेल्या आरोपींनी चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीवरून पंकजला अटक करण्यात आलेली आहे. हे आरोप सिद्ध होतील असा एकही ठोस पुरावा किंवा साक्षीदार खंडणीविरोधी पथकाकडे नाही, असा युक्तिवाद नलावडे यांनी केला.
‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार पंकज दाऊदसह सर्वच संघटित गुन्हेगारी टोळ्यांना अर्थसाहाय्य करतो. मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी २००८मध्ये मुंबई गुन्हे शाखेने अरुण गवळी व त्याच्या टोळीसह पंकजला मोक्काअंतर्गत अटक केली होती.