दोन दिवसांत नगाचा भाव पाच रुपये होण्याची शक्यता, कोंबडीचे दरही पडलेलेच

दरवाढीमुळे घटलेली मागणी आणि मार्गशीर्ष महिन्यात शाकाहार पाळण्याचा शिरस्ता, यामुळे अंडय़ाचे भाव गेल्या चार दिवसांत प्रतिशेकडा १०० ते १२० रुपयांनी गडगडले. त्यामुळे किरकोळ बाजारातही अंडय़ांची किंमत सात रुपयांवरून सहा रुपयांवर आली असून ती पाच रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कोंबडय़ांचे प्रजननही वाढल्याने जून-जुलैपेक्षा कोंबडीचे भावही उतरले आहेत.

नोव्हेंबरमध्ये पडलेल्या गारठय़ामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात अंडय़ांची मागणी वाढली. अंडी हा नाशवंत पदार्थ असल्याने मागणी व पुरवठय़ामधील तफावतीमुळे अंडय़ांच्या किमती वाढायला सुरुवात झाली आणि आठवडाभरात घाऊक बाजारात अंडय़ांच्या किमतींमध्ये प्रति शेकडा ४० रुपयांनी वाढ झाली. त्यानंतरच्या आठवडय़ात अंडय़ांचा भाव आणखी वधारला आणि १८ नोव्हेंबरला सर्वाधिक किंमत गाठली गेली. मुंबई, पुणे या शहरांबरोबरच दिल्ली आणि पंजाबमध्ये ५७० ते ५८५ रुपयांवर भाव गेले. भाव वाढल्याने अंडय़ांची मागणी घटली. त्यातच १९ नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या मार्गशीर्षमुळे अंडय़ांची मागणी घटली आणि चार दिवसांत अंडय़ांचे भाव ४० रुपयांनी कमी झाले. रविवारी मुंबई व पुणे येथे अंडी ४९० ते ५०० रुपयांनी विकली गेली. पुढील दोन दिवसांत हा भाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे, असे पुणे येथील ‘नॅशनल एग कोऑर्डिनेश कमिटी’चे अध्यक्ष माधव भागवत यांनी सांगितले.

दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात कोंबडय़ांच्या खाद्याचे भाव वाढले होते आणि गेल्या नोव्हेंबरमध्ये निश्चलनीकरणामुळे अंडय़ांसाठी फारशा कोंबडय़ाच विकत घेतल्या गेल्या नाहीत. यामुळे महाराष्ट्रातील अंडय़ांचे उत्पादन खाली घसरले आहे. २०१३-१४ या वर्षांत दररोज १ कोटीहून अधिक अंडय़ांचे उत्पादन होते. ते आता २० टक्क्यांहून कमी झाले आहे. सध्या राज्यात दिवसाला ८० लाखांपर्यंत अंडय़ांचे उत्पादन होते. त्यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगण या शेजारच्या राज्यांमधून अंडय़ांची आवक करावी लागते, असेही भागवत म्हणाले.  नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात भाज्यांचे दर वाढलेले असल्याने आणि थंडी पडल्याने देशभरात अंडय़ांची मागणी वाढली. मागणीच्या प्रमाणात उत्पादन मात्र झाले नसल्याने भाव झपाटय़ाने वाढले. किरकोळ बाजारात अंडय़ांचा दर पाच रुपयांवरून सात, साडेसात रुपयांवर पोहोचल्यावर मागणी कमी झाली. नंतर भाज्यांचे भावही थोडे उतरले. याचा परिणाम म्हणून अंडय़ांचे भाव गडगडले असून आता किरकोळ बाजारात अंडय़ांची किंमत सहा रुपयांवर आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंडय़ांचे भाव काही काळ वधारले असले तरी कोंबडय़ांच्या बाबतीत मात्र उलट स्थिती आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मागणी वाढते म्हणून दीड महिना आधीपासून पोल्ट्री फार्ममध्ये उत्पादन वाढवण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता एक किलो कोंबडीचा भाव ५५ रुपयांवर आला असून त्यांचा उत्पादन खर्च मात्र ६० रुपयांहून अधिक आहे. याउलट श्रावण, गणपतीत मागणी कमी असल्याने उत्पादनही कमी झाले होते व त्या वेळी कोंबडीचा भाव ६८ ते ७० रुपयांवर गेला होता, अशी माहिती नाशिकच्या आनंद अ‍ॅग्रोचे उद्धव अहिरे यांनी दिली.