मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एका दशकामध्ये भारताने जगातल्या अकराव्या अर्थव्यवस्थेपासून चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत मोठी मजल मारली आहे. आज देशाच्या संपूर्ण विकास व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र अतिशय वेगाने पुढे जात असून येत्या काळात देशाच्या विकास व्यवस्थेचे महाराष्ट्रच नेतृत्व करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.

देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय राष्ट्रध्वजारोहण सोहळा झाला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे, मुख्य सचिव राजेश कुमार, वैद्याकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने भारतीय सेनेने भारताची शक्ती काय आहे, हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. आपल्या सैनिकांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्व दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. यामुळे जगालाही नवीन भारत काय आहे हे समजले असे सांगून फडणवीस म्हणाले, आज देशाची विकासगाथा कोणीही थांबवू शकत नाही. देशात येणाऱ्या एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी ४० टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रामध्ये आली आहे. या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होत आहे. वस्तुनिर्माण, आयात-निर्यात, स्टार्टअप क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. ही एक मोठी विकासाची घोडदौड सुरू आहे. कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधनाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र देशाच्या संपूर्ण विकास व्यवस्थेत योगदान देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांना लवकरच दिवसा १२ तास वीज

राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळाली पाहिजे, याकरता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत जगातला सगळ्यात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२६मध्ये पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज मिळेल. त्यावेळी १०० टक्के हरित वीज देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

शेतीच्या क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हे क्षेत्र कशाप्रकारे फायद्याचे होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सिंचनाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. विशेषत: नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचा सरकारचा निर्धार आहे.देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री