मुंबई : आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देवून ‘आपले सरकार’ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात. नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांच्या कामांसाठी पालक सचिवांनी नियोजनबध्द कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले.

विधानभवन येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश कुमार आदी उपस्थित होते.

राज्यातील प्राथमिक आरोग्य सेवा मजबूत करून ग्रामीण भागाप्रमाणे शहरात देखील प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या वाढवावी.नवीन रूग्णवाहिकांसाठी करण्यात येणारे करार, ३९८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २८०६ उपकेंद्रांचे आधुनिकीकरण करण्यासाठी ५ हजार ९८३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा निधी टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. राज्यसरकार तसेच वित्तीय संस्थाकडून मिळणा-या निधीच्या खर्चाचे योग्य नियोजन करावे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, केंद्र शासनाच्या आरोग्य योजना व राज्यातील आरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यास प्राधान्य देण्यात यावे. प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी विभागाने नवीन मार्गदर्शक सूचना लागू कराव्यात. नवीन पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या स्थापनेबाबत कार्यवाही गतीने करावी, असे आदेशही त्यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

औषधे व उपकरणांची खरेदी सुलभ पध्दतीने करावी. आरोग्य सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा. सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या क्षमता बांधणीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत असलेल्या रूग्णालयांचा सर्व डेटा ऑनलाईन उपलब्ध करावा. एकाच वेळी खात्रीपूर्वक माहिती मिळाल्यामुळे रूग्णांना आणि आरोग्य विभागाला आरोग्य सेवा सुलभपणे देता येतील. नागरिकांना आरोग्य विभागातील सर्व योजनांची माहिती सहज उपलब्ध होण्यासाठी आरोग्य विभागाचे संकेतस्थळ देखील अद्यावत करण्यात यावे. राज्याच्या आरोग्य धोरणाचा सर्वसमावेशक प्रारूप आराखडा तयार करावा. आरोग्य विभागातील सेवा भरतीसाठी मंडळाची स्थापना करणे,आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण करून रूग्णांना चांगल्या दर्जाच्या सेवा देण्यासाठी आरोग्य विभागाने प्राधान्य द्यावे असे आदेशही मुख्यमंत्री यांनी दिले. आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक,सचिव विरेंद्र सिंह यांनी विभागातील कामकाजाचे सादरीकरण केले.