लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधिमंडळातील मारहाणीच्या घटनेमुळे सभागृहाची आणि आपल्या सर्वांची प्रतिमा मलिन झाली आहे. आमदार माजले आहेत असे लोक उघडपणे बोलू लागले आहेत, असे खडे बोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आमदारांना सुनावले. या घटनेनंतर आमदारांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी संसदेच्या धर्तीवर विधिमंडळातही नीतिमूल्ये समिती स्थापन करण्याची घोषणा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. दरम्यान मारहाणप्रकरणी दोन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली.
जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर या आमदारांच्या समर्थकांमध्ये विधान भवनाच्या आवारात गुरुवारी झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद विधिमंडळात उमटले. विधिमंडळ हे मुख्यमंत्री, मंत्री, आमदार किंवा कर्मचारी यांच्या मालकीचे नाही. ते राज्यातील १४ कोटी जनतेच्या मालकीचे आहे. समाजाला दिशा देण्याचे काम तेथे झाले पाहिजे असे फडणवीस यांनी नमूद केले.
या प्रकरणात अटक केलेल्या दोन्ही कार्यकर्त्यांवर फौजदारी आणि विशेष हक्कभंगाची कारवाई करण्याचा निर्णय झाल्याचेही नार्वेकर यांनी सांगितले. मारहाणप्रकरणी विधिमंडळाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी या घटनेचा अहवाल अध्यक्षांना सादर केला. त्यानुसार मारामारी प्रकरणातील नितीन देशमुख हा आव्हाड यांचा कार्यकर्ता असून सर्जेराव टकले हा पडळकर यांचा मावस भाऊ असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. या दोघांसह चार- सहा अनोखळी व्यक्तींविरोधात मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून देशमुख आणि टकले यांना पोलिसांनी अटक केली आहे.
ओळखपत्राशिवाय प्रवेश नको
विधिमंडळ अधिवेशनात अभ्यागतांना सरसकट प्रवेशबंदी करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला आहे. त्याबाबत असहमती व्यक्त करीत फडणवीस म्हणाले, काही लोकांनी चूक केली, म्हणून आपण विधिमंडळाचे दरवाजे जनतेला सदासर्वकाळ बंद करू शकत नाही. सुरक्षा उपाययोजना कठोर केल्या पाहिजेत आणि ओळखपत्र व अधिकृत प्रवेशपत्राशिवाय कोणालाही विधिमंडळ परिसरात प्रवेश देण्यात येऊ नये.
परब रानडुकरासारखे दिसले -गायकवाड
ठाकरे गटाचे अनिल परब चड्डी बनियानवरून मला नावे ठेवतात. मात्र ते मंत्री असताना मी त्यांच्या घरी गेलो होतो. तेव्हा ते मी जशा अवस्थेमध्ये मुंबईतील कॅन्टीनमध्ये दिसलो तशाच अवस्थेत ते होते. किंबहुना त्यांच्या अंगात बनियानपण नव्हते. आम्ही बनियानमध्ये माणूस तरी दिसतो, ते तर रानडुक्कर दिसत होते असे वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केले.
बुलढाण्याचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांनी अनिल परब, आदित्य ठाकरेंवर आक्षेपार्ह टीका केली आहे. शेगाव येथे शिंदे गटाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर गायकवाड माध्यमांशी बोलत होते.
गायकवाड म्हणाले, उद्धव ठाकरे जेव्हा लोणारमध्ये आले होते तेव्हा चड्डी बनियानचा आरोप करणाऱ्या आदित्यला मी चड्डी बनियानमध्ये उंचावर असलेल्या मंचावर पोहोचवले होते. कारण उद्धव यांना त्याला घेऊन चढता येत नव्हते.
पडळकरांची दिलगिरी, आव्हाडांकडून खेद
अध्यक्षांच्या आदेशानुसार गोपीचंद पडळकर यांनी घडलेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली तर जितेंद्र आव्हाड यांनी मी कधी कुणाला विधान भवनात आणले नाही. या घटनेशी आपला काहीही संबंध नसून उलट आपल्याला आणि कुटुंबाला धमक्या येत असल्याचे सांगत घडलेल्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले.
आरोपींवर अनेक गुन्हे
विधिमंडळातील हाणामारीप्रकरणी सर्जेराव टकले याच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल असून नितीन देशमुखविरोधात आठ गुन्हे दाखल आहेत. अशा व्यक्तींना विधिमंडळात अधिकृत प्रवेशपत्राशिवाय प्रवेश कसा दिला जातो आणि ते येऊन विधिमंडळात मारामारी करतात, हे योग्य नाही, असे फडणवीस म्हणाले.
एखादा आमदार चुकीचा वागला, तरी हा सत्तेचा माज किंवा गैरवापर आहे, असा सर्वांबद्दलच चुकीचा संदेश जनतेमध्ये गेला आहे.-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
बेशिस्त वर्तन करणाऱ्या आमदारांचे प्रसंगी सदस्यत्व रद्द करण्याचे अधिकारही नीतिमूल्य समितीला असतील. –राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष
(राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी रात्री विधान भवन परिसरात ठिय्या आंदोलन केले.)