मुंबई: महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच काळात मराठा आरक्षण रद्द झाले, त्यांना मराठा आरक्षण टिकविता आले नाही. ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी असून त्यांना आता आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकारही नसल्याचे जोरदार टीकास्त्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सोडले.
मराठा आरक्षणाबाबत सरकार जबाबदारी झटकत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देत ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे मारेकरी असल्याचा प्रत्यारोप शिंदे यांनी केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठा समाजास आरक्षण मिळाले. फडणवीस यांनी ते उच्च न्यायालयातही टिकविले. मात्र सर्वोच्च न्यायालयात ठाकरे सरकारने पाठपुरावा केला नाही. मराठा समाज प्रगत नाही हे न्यायालयास पटवून देण्यासाठी सरकारने काही केले नाही. हे आरक्षण घालवण्यास तुम्हीच जबाबदार आहात हे सकल मराठा समाज जाणून आहे. त्यामुळे आता उगाच समाजाला भडकवण्याचे काम करू नका असे शिंदे यांनी ठाकरेंना फटकारले.
हेही वाचा >>>मराठा आंदोलनामुळे एसटीचे कोट्यवधींचे नुकसान; नव्वदपेक्षा जास्त एसटी बसची तोडफोड
मराठा समाजास कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध असून त्यासाठी तीन न्यायमूर्तीची समिती गठित करण्यात आली आहे. मात्र समाजाने संयमाने आंदोलन करावे, सरकारला वेळ द्यावा, टोकाचे पाऊल उचलू नये आणि आंदोलनाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. दरम्यान, शिंदे यांनी सकाळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी या गावात उपोषणाला बसलेले नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधत तब्येतीची चौकशी केली.