मुंबई : वडिलांनी उसने दिलेली रक्कम परत मिळवण्यासाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी २३ वर्षीय तरूणाला अटक केली आहे. आरोपीने मुलाची किडनी विकून पैसे वसूल करण्याची धमकी दिली होती. आरोपीविरोधात खंडणी, अपहरण, डांबून ठेवणे, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरबाज सिद्दीकी शेख (२३) असे अटक आरोपीचे नाव असून तो मुंब्रा येथील रहिवासी आहे. आरोपीने तक्रारदार यांना ८० हजार रुपये उसने दिले होते. ती रक्कम परत मिळाली नाही. म्हणून त्याने तक्रारदाराच्या १६ वर्षांच्या मुलाचे अपहरण केले. त्यानंतर त्याला डांबून ठेऊन मारहाण केली. तसेच त्याची किडनी विकून पैसे वसून करण्याची धमकी दिली. त्यावेळी आरोपीने दीड लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला मुंब्रा येथून अटक केली.
तक्रारदार मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. त्यांनी आरोपी शेखकडून ८० हजार रुपये उसने घेतले होते. आरोपीने कुर्ला पूर्व येथून तक्रारदाराच्या १६ वर्षाच्या मुलाचे अपहरण केले. त्यावेळी आरोपीने दूरध्वनी करून तक्रारदाराकडे दीड लाख रुपये खंडणीची मागणी केली. रक्कम न दिल्यास मुलाची किडनी विकून रक्कम वसुल करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोपीला अटक केली.