प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तकी आणि अभिनेत्री सुधा चंद्रन यांची विमानतळावर कृत्रिम पाय काढण्यास सांगून तपासणी करण्यात आल्याप्रकरणी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) शुक्रवारी माफी मागितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई विमानतळावरील ‘सीआयएसएफ’च्या महिला अधिकाऱ्याच्या त्या कृतीने अपमानित आणि व्यथित झाल्याची भावना सुधा चंद्रन यांनी समाज माध्यमावर ध्वनिचित्रफितीद्वारे व्यक्त केल्यानंतर ‘सीआयएसएफ’ने ट्विटरद्वारे माफीनामा सादर केला आहे. सुधा चंद्रन यांना झालेल्या त्रासाबद्दल आम्हाला क्षमा करावी. केवळ अपवादात्मक परिस्थितीतच नियमानुसार सुरक्षा तपासणीदरम्यान कृत्रिम अवयव काढून तपासणी करणे आवश्यक असते. परंतु महिला सुरक्षा अधिकाऱ्याने सुधा चंद्रन यांच्या बाबतीत हा नियम का लक्षात घेतला नाही, याची चौकशी करण्यात येईल, असे ‘सीआयएसएफ’ने  म्हटले आहे.

विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांना अपवादात्मक परिस्थितीबाबतच्या नियमाबद्दल संवेदनशील राहण्याच्या सूचना देण्यात येतील, अशी ग्वाही ‘सीआयएसएफ’ने सुधा चंद्रन यांना ट्विटरद्वारे दिली आहे.  चंद्रन यांच्या बाबतीतील हा प्रकार गुरुवारी मुंबई विमानतळावर घडला होता.  अपघातात पाय गमावल्यानंतर सुधा चंद्रन यांनी कृत्रिम पायाच्या साह्याने भरत नाट्यम सादर करण्याचा इतिहास रचला आहे.  

विशेष ओळखपत्रासाठी पंतप्रधानांना विनंती

मुंबई : विमानतळावर घडलेल्या तपासणीच्या अपमानास्पद प्रकारानंतर अभिनेत्री सुधा चंद्रन यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक विनंती केली. कृत्रिम अवयव असलेल्या नागरिकांना ‘विशेष ओळखपत्र’ देण्यात यावे, असे त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक वेळी विमानतळावर अशा प्रकारच्या अपमानित करणाऱ्या तपासणीतून जावे लागत असल्याने अतिशय दु:ख होते. हे टाळण्यासाठी विशेष ओळखपत्र देण्याची विनंती चंद्रन यांनी केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cisf apologizes to actress sudha chandran akp
First published on: 22-10-2021 at 23:29 IST