मुंबई : सिटी सहकारी बँक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बजावलेल्या समन्सविरोधात माजी खासदार आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच कठोर कारवाईपासून तातडीचा दिलासा देण्याची मागणी केली. मात्र न्यायालयाने त्यांच्या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारी ठेवत त्यांना तोपर्यंत तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला. न्यायालयाने अडसूळ यांचे वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेशही यावेळी दिले.

ईडीने अडसूळ यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. तसेच  त्यांचे कांदिवली येथील घर व कार्यालयाची झडतीही घेतली होती. दरम्यान अडसूळ यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता अडसूळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेत कारवाईपासून संरक्षण देण्याची तसेच ईडीने नोंदवलेली तक्रार रद्द करण्याची मागणी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी या याचिकेवर तातडीने सुनावणी झाली. प्रतिपक्षाच्या नेत्याविरोधात जातपडताळणी प्रमाणपत्राबाबतची तक्रार केल्याने आपल्याला या प्रकरणी गोवण्यात आल्याचा दावा अडसूळ यांच्यातर्फे करण्यात आला. तसेच आपल्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार होते. मात्र ईडीचे अधिकारी तेथूनच आपल्याला ताब्यात घेण्याच्या तयारीत असल्याचा दावाही त्यांनी केला.