मुंबई : दिवाळीच्या १५ दिवस आधी मुंबईतील विविध बाजारपेठांतील दुकानांसमोर दाटीवाटीने अडकवलेले आकर्षक आकाश कंदिल या वर्षी मात्र अद्याप दृष्टीला पडलेले नाहीत. वाढती महागाईमुळे पारंपरिक कंदिलांकडे नागरिकांनी फिरवलेली पाठ, शाळा-महाविद्यालयांची लांबलेली परीक्षा आणि बेभरवशी पावसामुळे होणारे नुकसान अशा विविध कारणांमुळे आकाश कंदील उजळलेले नाहीत.

दरवर्षी मुंबईतील रस्ते आकाश कंदील, चांदण्या यांनी सजतात. शाळा-महाविद्यालयांतील चार-पाच विद्यार्थी एकत्र येऊन आकर्षक असे लहान – मोठ्या आकाराचे आकाश कंदील तयार करून दिवाळीपूर्वी त्यांची विक्री सुरू करतात.

प्रति कंदील साधारण ३५० ते ४५० रुपये दराने विकण्यात येतात. त्यामुळे मुलांना अवघ्या १५-२० दिवसांत चांगला नफा मिळतो. दिवाळीचा खर्च वा त्यानंतर शाळा-महाविद्यालयाचे शुल्क भरण्यासाठी ही रक्कम कामी येते. अनेक जण केवळ छंद म्हणून हा व्यवसाय करतात, तर काही जण कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातभार लागावा या उद्देशाने कंदिल बनवतात.

हेही वाचा – वरळीमध्ये आदित्य ठाकरेंचे शक्तिप्रदर्शन, शिवसेनेच्या नेत्यांसह हजारो शिवसैनिकांची गर्दी

गतवर्षीच्या तुलनेत कंदिलासाठी लागणारा कागद, बांबूच्या तासलेल्या काड्यांचे दर काही अंशी वाढले आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी ३५० रुपयांना मिळणारा आकाश कंदिल यंदा थोडासा महाग होण्याची शक्यता आहे. परंतु बाजारातील मंदीमुळे त्रस्त नागरिक आकाश कंदिल घ्यायचा की नाही, असाही विचार करीत आहेत.

गेले काही दिवस पहाटे आणि सायंकाळी पाऊस तर दुपारी कडक उन असे वातावरण आहे. मुंबईच्या आसपासच्या उपनगरांत नित्यनियमाने सायंकाळी पाऊस हजेरी लावत आहे. काही मुलांनी आकाश कंदिल बनवले आहेत. परंतु, अवेळी कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर आकाश कंदिल विक्रीसाठी कसे ठेवायचे, असा प्रश्न या मुलांना पडला आहे.

भाड्याने जागा घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही आणि अवेळी येणाऱ्या पावसामुळे कंदील भिजल्यास नुकसान होण्याची शक्यता आहे, असा पेच या मुलांसमोर आहे. त्यामुळे अद्याप कंदील विक्रीसाठी मांडण्यात आलेले नाहीत. परिणामी, अनेकांनी तयार केलेले आकाश कंदील सुरक्षित जागी ठेवण्यात आले असून तेथूनच परस्पर कंदिलांची विक्री करण्याचा मुलांचा प्रयत्न आहे. मात्र ते शक्य झाले नाही तर येत्या शनिवारी, रविवारी पावसाचा अंदाज घेऊन कंदील विक्रीसाठी मांडण्याचा या मंडळींचा मानस आहे.

एकाच महिन्यात दोन सण

ऑक्टोबरच्या सुरुवातीला नवरात्रोत्सव पार पडला, तर महिनाअखेरीस दिवाळी आली आहे. घटस्थापनेला ३ ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली आणि १२ ऑक्टोबर रोजी दसरा होता. येत्या २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. सर्वसाधारणपणे धनत्रयोदशीच्या दिवशी घरोघरी कंदिल लावण्यात येतात. तत्पूर्वी १५ दिवस आधी ठिकठिकाणी विक्रीला मांडलेल्या कंदिलांच्या विक्रीला सुरुवात होते. मुख्य बाजारपेठा, गिरगाव, ग्रॅन्ट रोड, मुंबई सेंट्रल, लालबाग, परळ, दादरसह उपनगरांत ठिकठिकाणी कंदिल विक्रीसाठी मांडण्यात येतात. परंतु यंदा सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव आणि ऑक्टोबरमध्ये नवरात्रोत्सव आणि दिवाळी आल्यामुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

हेही वाचा – बदलापूर प्रकरण : कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई केली ? उच्च न्यायालयाचा सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिनाअखेर चणचण

महिनाअखेरीस दिवाळी आल्यामुळे अनेकांना आर्थिक तंगी भेडसवत आहे. आर्थिक मंदी आणि वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना काटकसरीने दैनंदिन खर्च भागवावा लागत आहे. दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळांचे दुसरे सत्र सुरू होत आहे. मुलांची शाळेची दुसऱ्या सत्राची फी भरण्यासाठी आर्थिक व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे अनेकांनी आखडता हात घेतला आहे.