धारावीतील सेक्टर १ मधील मुंबई महानगरपालिकेच्या इमारती आणि चाळींतील रहिवाशांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत ६५० ते ७५० चौरस फुटांचे घर मिळावे या मागणीसाठी गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून धरणे आंदोलन केले आहे. वांद्रे पूर्व येथील धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) कार्यालयाबाहेर (म्हाडा भवन) रहिवाशांचे आंदोलन सुरू आहे.
हेही वाचा >>>मुंबई : गोरेगाव मध्ये रिक्षाचालकाकडून तरुणाचा खून
‘डीआरपी’ने धारावी पुनर्विकासासाठी नुकत्याच निविदा मागविल्या आहेत. या प्रकल्पासाठी २००९ पासून निविदा प्रक्रिया सुरू आहे, पण ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे पुनर्विकास मार्गी लागू शकलेला नाही. परिणामी, धारावीकरांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. पुनर्विकासात रहिवाशांचा योग्य तो विचार करण्यात येत नसल्याचा आरोप सेक्टर १ मधील रहिवाशांकडून करण्यात येत आहे. सेक्टर १ मध्ये मोठ्या संख्येने मुंबई महानगरपालिकेच्या चाळी आणि इमारती आहेत. या चाळी/इमारतींतील रहिवाशांना नव्या नियमाप्रमाणे ६५० ते ७५० चौरस फुटांची घरे द्यायला हवीत. पण प्रत्यक्षात ४०५ चौरस फुटांची घरे देण्यात येत आहेत. हा अन्याय असल्याचा आरोप करीत सेक्टर १ मधील रहिवाशांनी गुरुवारी ‘डीआरपी’च्या कार्यालयावर धडक दिली.
हेही वाचा >>>मुंबई : गिरगावातील गोदामास भीषण आग ; लगत उभी वाहने जळून खाक
या आंदोलनात मोठ्या संख्येने रहिवासी सहभागी होणार होते. मात्र १४४ कलम लागू असल्यामुळे शाहू नगर पोलिसांनी काही आंदोलकांना धारावीतच रोखून धरले. काही रहिवासी वांद्रे येथील म्हाडा भवनाबाहेर जमा झाले आणि त्यांनी धरणे आंदोलनास सुरू केले. या आंदोलनानंतरही चाळी आणि इमारतींतील रहिवाशांना ७५० चौरस फुटांची घरे देण्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.