एक सहा वर्षांचा मुळचा इराकमधील असलेला मुलगा दुर्मिळ व्याधीने ग्रासल्याने चालू शकत नव्हता. त्याच्या या व्याधीवर इराकमध्ये केलेले उपचार व्यर्थ गेल्यावर उपचारासाठी त्याला भारतात आणण्यात आले. इथल्या डॉक्टरांच्या उपचारांना यश आले असून, तो मुलगा आता स्वत:च्या पायावर चालू शकतो. ‘अर्थोग्रापोसिस मल्टिप्लेक्स काँजेनिटा’ (एएमसी) व्याधिने ग्रस्त असलेल्या या मुलाला कोणत्याही शस्त्रक्रियेविना बरे करण्यात भारतातील डॉक्टरांना यश आले.
मुस्तफा रबीआ अब्दुल नावाच्या या मुलाचे दोन्ही पाय ९० अंशाच्या कोनात दुमडलेले होते. मुंबईतील एका रुग्णालयात त्याच्यावर करण्यात आलेल्या उपचारात त्याचे दुमडलेले दोन्ही पाय शस्त्रक्रियेविना सरळ करण्यात डॉक्टरांना यश आले. मार्च महिन्याच्या अखेरीस सदर मुलाने पहिल्यांदा चालण्याचा अनुभव घेतला.
‘एएमसी’ ही एक दुर्मिळ व्याधी असून, जगभरात पंधराशे नवजात अर्भकांमागे एखादे अर्भग या व्याधीने ग्रस्त जन्मास येते. ही व्याधी झालेल्या बाळाच्या शरीरातील मासपेशींमध्ये कमकूवतपणा येऊन शरीराच्या एखाद्या अवयवाला व्यंग प्राप्त होते. मुस्तफाच्याबाबतीत त्याचे गुडघे बाधीत झाले. ज्यामुळे तो जन्मापासून अंथरुणाला खिळून होता. मुस्तफा चालण्यास असमर्थ असल्याने घरात सर्वत्र रांगतच जात असल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले. अनेकवेळा अशाप्रकारच्या व्यंगावर छोटीशी शस्त्रक्रिया करुन उपचार करणे शक्य असते, परंतु मुस्तफाच्याबाबतीत त्याचे गुडघे कायमस्वरुपी ९० अंशाच्या कोनात दुमडलेले होते. मनुष्यप्राण्यात हा कोन १८० अंशाचा असतो. ज्यायोगे आपल्याला पाय दुमडता अथवा सरळ करता येत असल्याचे मुस्तफावर उपचार करणारे फोर्टिस हॉस्पिटलचे अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉ. सचिन भोसले यांनी सांगितले.
भारतात येण्याआधी मुस्तफावर इराकमध्ये एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती, जी अयशस्वी ठरली. पुन्हा शस्त्रक्रिया केल्यास मुस्तफाच्या पायांना मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचण्याची शक्यता वर्तवत मुंबईतील डॉक्टर शस्त्रक्रिया करण्याच्या विरोधात होते. पुन्हा शस्त्रक्रिया केल्यास मुस्तफाला पाय गमावावा लागण्याची शक्यता होती. मुस्तफावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ‘रिंग फिक्सेटर’चा वापर करण्याचा निर्णय घेतला. मांड्या, गुडघे आणि पावलासह संपूर्ण पायाला या रिंगा बसविण्यात आल्या. ‘रिंग फिक्सेटर’ला स्क्रु असतात. प्रत्येक दिवशी ३ ते ४ वेळा स्क्रु पिळून त्याचे पाय एक अंशापर्यंत सरळ करण्यात डोक्टरांना यश मिळत होते. दोन महिन्यात त्याचे पाय १२० अंशापर्यंत सरळ झाले. उपचारादरम्यान प्रत्येक दिवशी काही मिलीमिटरने मुस्तफाचे पाय सरळ होत गेले. ‘रिंग फिक्सेटर’मुळे त्याच्या अधू पायांना जोर मिळण्यासदेखील मदत झाली. मुस्तफा आता आपल्या पायांवर चालू शकत असून, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तो आपल्या वडिलांबरोबर इराकला रवाना झाला.