मुंबई : निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह ‘घडय़ाळ’ यावरील मालकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्यात जोरदार जुंपली आहे. पक्ष आणि चिन्ह आपणालाच मिळणार असा विश्वास उभय गटांना वाटत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील भावनिक आवाहन केले. सुनावणी दरम्यान अजित पवार गटाच्या युक्तिवादावर आव्हाड यांनी टिप्पणी केली. ज्या पद्धतीने अजित पवार गटाने युक्तिवाद केला. ते त्यांना शोभत नाही, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. शरद पवार हुकूमशाह आहेत. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लोकशाही जिवंत ठेवली नाही. असे म्हणणाऱ्यांनी पक्षामध्ये राहायचे नव्हते, पक्ष सोडून जायचे होते. आम्हाला तुमच्या पक्षात राहायचे नाही. आम्ही स्वतंत्र पक्ष काढतो, असे सांगायचे होते.वकिलामार्फत जो युक्तिवाद केला तो त्यांना शोभत नाही. ते अशोभनीय आहे, असे भाष्य आव्हाड यांनी केले.
शरद पवार यांनी नवी दिल्लीत ‘मीच पक्षाचा संस्थापक अध्यक्ष आहे’, अशा आशयाचे विधान केले होते. या विधानावर अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी पवारांच्या विधानावर भाष्य केले. शरद पवार जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असतील तर मीदेखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिला प्रदेशाध्यक्ष आहे. माझेसुद्धा पक्ष बांधणीत योगदान आहे, अशी टिप्पणी केली आहे. निवडणूक आयोगात पक्ष आणि चिन्ह यांच्या मालकीविषयी सुनावणी सुरू राहणार आहे तोपर्यंत दोन्ही गटात जोरदार धुमश्चक्री सुरू राहणार आहे.