२५ वर्षांच्या महिलेवर काळी जादू केल्याप्रकरणी आणि बलात्कार केल्याप्रकरणी एका मौलवीला मुंबई सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. नविल मलिक असे या मौलवीचे नाव आहे. २५ वर्षांच्या महिलेने त्याच्याविरोधात काळी जादू केल्याची आणि बलात्कार केल्याची तक्रार केली. तुझ्यात सती दोष आहे असे या मौलवीने या महिलेला सांगितले. तसेच तो दूर करण्यासाठी मला अश्लील भाषेत शिवीगाळही केली असेही या महिलेने म्हटले आहे. मुंबईत ही घटना घडली आहे.
पीडित महिलेने मलिक या मौलवीला माझे कुटुंब ओळखत असल्याचेही म्हटले आहे. तसेच तो ज्या मशिदीत असे तिथेच माझे कुटुंबीय जात असेही या महिलेने म्हटले आहे. पीडित महिला विवाहित आहे. मी एका हिंदू मुलाशी लग्न केले. मात्र आर्थिक अडचणी भासू लागल्याने मी माझ्या वडिलांच्या घरी २०१५ मध्ये परत आले. त्यानंतर माझ्यात दोष असल्याचे सांगत या मौलवीने माझ्या घरातल्यांना पूजा करण्यासाठी तयार केले. मलिक माझ्या घरी आला, त्यानंतर त्याने मला काही शब्द कागदावर लिहिण्यास सांगितले. त्यानंतर हे शब्द लिहिलेले कागद या मौलवीने जाळून टाकले असेही या महिलेने सांगितले आहे.
सप्टेंबर २०१५ मध्ये मलिक माझ्या घरी आला. तिथे त्याने मला एका ग्लासात काही गोळ्या घालून पाणी दिले. त्यानंतर ते पाणी मला प्यायला दिले. त्यानंतर त्याने माझे लैंगिक शोषण केले असेही या महिलेने म्हटले आहे. त्याने काही प्रार्थना उर्दू भाषेत लिहिल्या. माझ्या शरीराभोवती ते कागद ठेवले आणि जाळले. त्यानंतर हळूहळू माझी शुद्ध हरपली. मी बेशुद्ध अवस्थेत असताना त्याने माझे शोषण केले. शुद्ध आली त्यावेळी माझ्यावर अत्याचार झाल्याची जाणीव मला झाली असेही या महिलेने म्हटले आहे. महिलेच्या या तक्रारीनंतर मौलवी मलिकला अटक करण्यात आली. त्याला काळी जादू आणि बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक केली. त्याला आता १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.