मुख्यमंत्र्यांची ग्वाही, पंधरवडय़ात विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप

मुंबई : विविध पक्षांतील नेते भाजपमध्ये प्रवेश करीत असले, तरी ही स्वबळाची तयारी नाही. शिवसेनेबरोबरची आमची युती अभेद्यच असून विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावर येत्या दहा-पंधरा दिवसांत शिक्कामोर्तब होईल, असा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिला.

माजी मंत्री मधुकराव पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड, राष्ट्रवादीचे माजी आमदार संदीप नाईक, शिवेंद्रसिंह भोसले, महात्मा फुले यांच्या घराण्यातील नीता होले, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक, माजी आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील यांचाही भाजप प्रवेश यावेळी झाला. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.

भारतीय जनता पक्ष ही काही धर्मशाळा नाही, केवळ जनतेत स्थान असलेल्या चांगल्या लोकांनाच पक्षात प्रवेश दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षातील बरेच आमदार आणि नेते भाजपमध्ये येत आहेत. काही शिवसेनेत जात आहेत. त्यावरून दोन्ही पक्ष स्वबळाची तयारी करीत आहेत, अशी चर्चा सुरू आहे. या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. आगामी निवडणूक युतीच्या माध्यमातूनच लढविली जाईल आणि बहुमताचे विक्रम मोडून आम्ही पुन्हा सत्तेत येऊ, असे ते म्हणाले.

कोल्हापूरच्या गादीचे छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले हे याआधीच भाजपशी जोडले गेले. आता महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असलेले शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला.

१ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रा सुरू करत असून युतीच्या पाठीशी जनादेश उभा करण्याचे काम यात्रेतून करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

भुजबळांना धाक दाखवला होता का?

ईडी आणि इतर सरकारी यंत्रणांचा धाक दाखवून भाजपचे नेतृत्व विरोधी पक्षातील नेते आणि आमदार फोडत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. त्यावर, छगन भुजबळ आणि गणेश नाईक यांना शिवसेनेतून फोडून आपल्यासोबत घेताना शरद पवार यांनी या दोघांना असा काही धाक दाखवला होता का, असा सवाल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.

नाईकांचा प्रवेश थाटात?

नवी मुंबईतील ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचा पक्षप्रवेश लवकरच एका मोठय़ा कार्यक्रमात होणार असल्याचे सांगण्यात आले.

जागांची अदलाबदल अटळ

नव्या लोकांच्या येण्याने फार तर काही जागांची अदलाबदल युतीमध्ये करावी लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याबाबत पुढील १५ दिवसांत  निर्णय घेऊन जागावाटप निश्चित करण्यात येईल, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

‘कमीपणा आणणार नाही’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘देशाने आणि राज्याने आता भाजपच्या विकासाचा मार्ग निवडला आहे. ही लोकभावना आणि कार्यकर्त्यांचे मत लक्षात घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आमच्यामुळे पक्षाला कधीही कमीपणा येऊ  देणार नाही,’’ अशी भावना मधुकर पिचड यांनी व्यक्त केली. तर पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादी सोडावी लागल्याबद्दल बोलताना चित्रा वाघ यांना अश्रू अनावर झाले.